अखेर विमा कंपनी नरमली; चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना मिळणार २०२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 02:40 PM2024-08-12T14:40:43+5:302024-08-12T14:41:53+5:30

पीक विमा : रक्षाबंधनापूर्वीच मिळणार शेतकऱ्यांना खुशखबर

Finally the insurance company relented; 202 crores will be given to farmers in Chandrapur | अखेर विमा कंपनी नरमली; चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना मिळणार २०२ कोटी

Finally the insurance company relented; 202 crores will be given to farmers in Chandrapur

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन चंद्रपूर येथे दोन तसेच मुंबई येथे कृषीमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यानंतर मात्र विमा कंपनी नरमली असून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची २०२ कोटी ७६ लाखांची रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत मिळणार आहे.


नियोजन भवन येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, चंदनसिंग चंदेल, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, बंडू गौरकर आदी उपस्थित होते.


पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन ५ ऑगस्ट रोजी चंद्रपुरात, लगेच ७ ऑगस्ट रोजी मुंबई कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शनिवारी (दि.१०) पुन्हा चंद्रपूर येथे पीक विमा योजनेचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.


प्रथमच पीक विम्यासाठी एवढी मोठी रक्कम
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे एकूण २०२ कोटी ७६ लाख २३ हजार ९४४ रुपयांचे क्लेम आहेत. यात १ लाख ५१ हजार ३५२ शेतकऱ्यांचा समावेश असून यापैकी ८६ हजार ६५७ शेतकऱ्यांना ८० कोटी ६६ लाख ३४ हजार ९१० रुपयांचे विमा रक्कम मिळाली आहे. कंपनीकडून उर्वरित ६३ कोटी रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वी शेतकयांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासनाच्या वतीने उर्वरित ५९ कोटींची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.


४६ हजार ५०० शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा
ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीक विम्याचा क्लेम मिळाला नाही. अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होणार आहे. उर्वरित ४६ हजार ५० शेतकऱ्यांना आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच साधारण ५६ कोटी रुपये मिळणार आहेत.


येथे जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विम्याचे ३ लक्ष ४६ हजार अर्ज
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यापूर्वी केवळ ६२ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता: मात्र गतवर्षी १ लक्ष ८४ हजार २६० शेतकऱ्यांचे ३ लक्ष ४१ हजार २३३ अर्ज आले. तर यावर्षी आतापर्यंत १ लक्ष ७९ हजार ४२२ शेतकऱ्यांचे ३ लक्ष ४६ हजार ६९२ अर्ज आले आहेत.


४ हजार ६६८ डुप्लिकेट अर्जाची पडताळणी
जिल्ह्यातील ४ हजार ६६८ डुप्लिकेट अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये मान्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्रॉप मिसमॅचच्या १ हजार ७६२ अर्जाची कृषी विभाग आणि विमा कंपनी पुन्हा नव्याने पडताळणी करणार आहे.


नो रेनफॉलचे २० हजार ९५ अर्ज
नो रेनफॉल या अटी अंतर्गत २० हजार ९५ शेतकऱ्यांचे अर्ज होते. हे सर्व अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने म्हटले आहे. पेरील नॉट कव्हर्ड या अंतर्गत असलेले ६ हजार ८६४ अर्ज, लेट इंटिमेशन (सूचना वेळेवर न देणे) अंतर्गतचे ७ हजार ९५९ अर्ज, क्लेम स्कुटीनी अंतर्गत ४ हजार ८११ अर्ज व इतर त्रुटी असलेले असे साधारणतः ३७ हजारांच्या वर अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने कबूल केले आहे.
 

Web Title: Finally the insurance company relented; 202 crores will be given to farmers in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.