वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:17 PM2018-10-02T22:17:43+5:302018-10-02T22:18:02+5:30
सिगल व थ्री फेज नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी यापुढे हजार ते अडीच हजारांपर्यंत बाजारात विकत मिळत असलेली ईएलसीबी उपकरण लावणे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अनिवार्य केल्याने ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : सिगल व थ्री फेज नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी यापुढे हजार ते अडीच हजारांपर्यंत बाजारात विकत मिळत असलेली ईएलसीबी उपकरण लावणे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अनिवार्य केल्याने ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
विद्युत निरीक्षक मंडळाने याबाबत सूचना निर्गमित केल्याने आर्थिक भुर्दंड सोसून ईएलसीबी लावणे अत्यावश्यक ठरले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनिमय २०१० च्या क्र. ४२ प्रमाणे सिंगल फेज व थ्री फेज नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना ईएलसीबी जोडणी करारनामा असणे अनिवार्य केल्याने ग्राहक अडचणीत सापडले आहेत.
ए वन फॉर्मसोबत जोडण्यात आलेल्या विद्युत कंत्राटदाराच्या चाचणी अहवालात वीज दाबाला अनुसरून योग्य क्षमतेची ईएलसीबी लावल्याचा उल्लेख असणे आवश्यक केले आहे.
नवीन विद्युत कनेक्शन घेताना यापूर्वी ईएलसीबीची आवश्यकता नसल्याने सरसकट विद्युत कनेक्शन दिले जात होते. मात्र केंद्रीय विद्युत प्राधिकरण मंडळाने याबाबत सबंधित विद्युत मंडळाच्या विभाग व उपविभागांना पत्र पाठवून ईएलसीबीशिवाय नवीन कनेक्शन न देण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसून ईएलसीबी लावणे अत्यावश्यक झाले आहे.
ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या संदर्भात निर्णय घेतल्याचे विद्युत कंपनीचे म्हणणे असले तरी आर्थिक भार ग्राहकांना सोसावा लागणार असल्याने नाराजीचा सूर दिसत आहे. ग्राहकांचा हिताच्या दृष्टीने विद्युत कंपनी कार्य करीत नसून महागाईच्या काळात आर्थिक झळ पोहचविण्याचे काम कंपनी करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
कपंनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कंपनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवित असल्याचा आरोप केला जात आहे. वीज वितरण कंपनीने ईएलसीबीची अट रद्द करण्याची मागणी आहे.
ग्राहकांचे हित लक्षात घेऊ न ईएलसीबीची नवीन कनेक्शनसाठी अट घातली आहे. घरात केलेली फिटींगमध्ये ४ ते ५ वर्षांनी बदल होत असल्याने वायरिंग फाल्ट अथवा अर्थिंगचा धोका कायम असतो. अनवधनाने काही अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईएलसीबीने काही बिघाड असेल तर तो त्वरित कळतो. आणि धोका टाळला जाऊ शकतो. कंपनीने केलेली ईएलसीबीची सक्ती ग्राहकांच्या हितासाठीच आहे.
-चंदन चौरसिया,
उपकार्यकारी अभियंता,म. रा. वि. कंपनी, उपविभागीय मूल