अमृत आहार योजना राबविताना अंगणवाडी सेविकांना आर्थिक ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:28 AM2020-12-29T04:28:06+5:302020-12-29T04:28:06+5:30
चिमूर : सप्टेंबर २०२० ला मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला. कमिटी बरखास्त झाल्या. ग्रामपंचायतवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात ...
चिमूर : सप्टेंबर २०२० ला मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला. कमिटी बरखास्त झाल्या. ग्रामपंचायतवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. अमृत आहार योजनेची रक्कम समितीच्या खात्यात असतानाही काढता येत नाही. त्यामुळे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविताना अंगणवाडी सेविकांना आर्थिक ताण पडत आहे.
आदिवासी विभागामार्फत २०१६ पासून डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना अंगणवाडी केंद्रात सुरु करण्यात आली, या योजने अंतर्गत स्तनदा माता, गरोदर माता, कुपोषित बालके यांना पोषण आहार पुरविल्या जाते. योजनेचे आर्थिक व्यवहार समितीचे अध्यक्ष व आंगणवाडी सेविका आणि काही गावामध्ये सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संयुक्त स्वाक्षरीने होतात.मात्र मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूका जाहीर झाल्यापासून निवडणूक प्रक्रिया व सरपंचाची निवडणूकीसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अंगणवाडी सेविकांनी आर्थिक ओढाताण करत सप्टेंबरपासून तर डिसेंबरपर्यत अमृत आहार योजना चालवली. योजनेची रक्कम समितीच्या खात्यात जमा असताना काढता येत नाही. योजना चालविण्यास आंगणवाडी सेविकांना अडचत होत आहे. मात्र प्रशासन गांभीर्याने घेत नाही. ते दुर्लक्ष करीत आहे.
आंगणवाडी सेविकांना होणारा आर्थिक अडचणीचा त्रास कमी करावा व आर्थिक अडचण दूर करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अन्यथा १ जानेवारी २०२१ पासून अमृत आहार योजनेचा पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष इमरान इखलाख कुरेशी यांनी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविलेेल्या निवेदनातुन दिला आहे.