कार्यक्षेत्राबाहेर चालतो सहकारी पतसंस्थांचा आर्थिक व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:19 AM2021-06-20T04:19:50+5:302021-06-20T04:19:50+5:30

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही मोठ्या बँका सर्वसामान्य ग्राहकांना कर्ज पुरवठा करण्यास नकार देतात. त्यामुळे पतसंस्थांकडून मिळणारे अर्थबळ अशा वंचित ...

Financial transactions of co-operative credit societies run outside the scope of work | कार्यक्षेत्राबाहेर चालतो सहकारी पतसंस्थांचा आर्थिक व्यवहार

कार्यक्षेत्राबाहेर चालतो सहकारी पतसंस्थांचा आर्थिक व्यवहार

googlenewsNext

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही मोठ्या बँका सर्वसामान्य ग्राहकांना कर्ज पुरवठा करण्यास नकार देतात. त्यामुळे पतसंस्थांकडून मिळणारे अर्थबळ अशा वंचित ग्राहकांसाठी नवसंजीवनीच ठरत आहे. त्यामुळे हजारो ग्राहक आपले आर्थिक पतसंस्थांच्या माध्यमातून व्यवहार करतात. सहकारी पतसंस्थांमध्ये विभागीय कार्यक्षेत्रात महसूल विभाग, जिल्हा कार्यक्षेत्रात संपूर्ण जिल्हा व तालुका कार्यक्षेत्र तालुका आणि शहर असे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. ज्या कार्यक्षेत्रात संबंधित पतसंस्थांची निर्मिती झाली. त्या संस्थेला त्याच कार्यक्षेत्रातील सभासद तयार करणे आणि आर्थिक व्यवहार करणे बंधनकारक आहे. पतसंस्था मंजुरीच्या आदेशात या सर्व बाबी नमूद केलेल्या असतात; परंतु कार्यक्षेत्राच्या चौकटी ओलांडून आर्थिक व्यवहार करण्याचे प्रकार काही महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती आहे.

पाच तालुक्यातील पतसंस्थांवर संशय

चिमूर, ब्रह्मपुरी, सावली मूल व गोंडपिपरी तालुक्यातील काही पतसंस्था नियम धाब्यावर ठेवून कार्यक्षेत्राबाहेर वित्तीय व्यवहार करीत असल्याचे समजते. जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे हे जिल्ह्यातील पतसंस्थांचा नियमित आढावा घेत होते. मात्र, कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. पतसंस्थांचा कारभार पारदर्शी राहावा, यासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी या विभागात आजही कार्यरत आहेत. कोरोना संसर्ग आता कमी झाला. त्यामुळे काही बेलगाम संस्थांवर अंकुश ठेवण्याची मागणी काही ग्राहकांनी केली आहे.

रिक्त पदांमुळे पतसंस्थांचे फावले

सहकार विभागात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तालुका निबंधक कार्यालयातही कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने दैनंदिन प्रशासकीय कामे अडचणीत येतात. जिल्हास्तरावरही कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे काही पतसंस्थांचे फावत असून अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन वित्तीय व्यवहार करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

‘त्या’ फसवणुकीला जबाबदार कोण?

परजिल्ह्यातील पतसंस्थेची दुसऱ्या जिल्ह्यात शाखा स्थापन करण्यासाठी राज्य पातळीवरून मंजुरी दिली जाते. मात्र, ही शाखा सुरू झाल्यानंतर संबंधित जिल्हा उपनिबंधकांना माहिती देणे अथवा परवानगीसंदर्भात काहीही कळविले जात नाही. यवतमाळ व अन्य जिल्ह्यातील काही संस्थांच्या शाखा चंद्रपूर जिल्ह्यातही कार्यरत आहे. या संस्थांकडून ग्राहकांची फसवणूक झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्नच आहे.

कोट

सहकारी पतसंस्था तालुका कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन आर्थिक व्यवहार करीत असल्याच्या अद्याप कुणाच्याही तक्रारी आल्या नाहीत. तालुका निबंधकांकडे अशा तक्रारी आल्या असतील तर चौकशीनंतर कार्यवाही करू.

-देवेंद्र शेकोकर, सहायक जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूर

Web Title: Financial transactions of co-operative credit societies run outside the scope of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.