राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेत आर्थिक घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:34 AM2021-02-17T04:34:46+5:302021-02-17T04:34:46+5:30
चिमूर : काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील मोठ्या बँकेत आर्थिक घोळ झाल्याचे निदर्शनात येताच चिमूर शहरात नावारुपास असलेली राष्ट्रसंत ...
चिमूर : काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील मोठ्या बँकेत आर्थिक घोळ झाल्याचे निदर्शनात येताच चिमूर शहरात नावारुपास असलेली राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील मुख्य लिपिक व माजी व्यवस्थापक यांनी संस्थेतील संगणकाव्दारे अंदाजे ६० लाख रुपयांचा आर्थिक घोळ करत अफरातफर केल्यासंदर्भात संस्थेचे मानद सचिव उमेश कुंभारे यांनी चिमूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
त्यामुळे संस्थेचे ठेवीदार व ग्राहक यांच्यात पतसंस्थेविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये अमोल अरुण मेहरकुरे मुख्य लिपिकपदावर २०१६ पासून कर्तव्यावर आहे. त्यांनी संस्थेच्या रकमेची संगणकाव्दारे अफरातफर व मारोती वाल्मीक पेन्दोर हे ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत व्यवस्थापकपदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या सहीशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार होत नव्हते. मात्र सदर कालावधीत संस्थेची दीड लाख रुपयांच्या रक्कमेसह आमद लाभांश रक्कम, कार्यालय भाडे सहपत्रानुसार नमूद केलेल्या व्यक्तीच्या चालू खात्यात रक्कमा दोन्ही व्यक्तींनी परस्पर वळती केल्या आहेत. त्यांच्या खात्याला रक्कम जमा असल्याचे व अफरातफर केल्याचे १२ फेब्रुवारीला चिमूर पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
संस्थेतील संगणकाव्दारे अंदाजे ६० लाख रुपयांची रक्कम अफरातफर करून वेगवेगळ्या खात्यात वर्ग करून आर्थिक घोळ केला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. त्या रकमांची नोंद दैनिक रोजनीशी बुकाला नाही.
कोट
राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये लिपिक व इतरांच्या विरोधात चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सदर प्रकरण चौकशीत आहे.
-रवींद्र शिंदे
ठाणेदार, पोलीस स्टेशन, चिमूर