रिंग रोडसाठी जागेचा पर्याय शोधावा
By admin | Published: April 4, 2015 12:32 AM2015-04-04T00:32:30+5:302015-04-04T00:32:30+5:30
चंद्रपूर महानगराच्या बाहेरून रिंग रोड (बायपास रोड) अत्यंत आवश्यक आहे.
रिंग रोड हवाच : नागापुरे यांची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर महानगराच्या बाहेरून रिंग रोड (बायपास रोड) अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने त्यासाठी जागेचा पर्याय शोधावा, अशी मागणी नगरसेवक अशोक नागापुरे यांनी केली आहे.
चंद्रपूर हे महानगर व औद्योगिक शहर आहे. शहरातील लोकसंख्येची घनता जास्त आहे. संपूर्ण शहर दाट लोकवस्तीचे झाले आहे. मात्र दळणवळणाच्या दृष्टीने शहरातील रस्ते गैरसोयीचे आहेत. जडवाहनांची वाहतूक शहराच्या मुख्य रस्त्यावरूनच होते. जडवाहनांची वाहतूक ही जीवघेणी ठरत आहे. अपघातात अनेकांचा बळी जात आहे. त्यामुळे जडवाहनांची वाहतूक शहराच्या सीमेलगतच्या ट्रायस्टार हॉटेल ते वीज केंद्राच्या संरक्षण भिंतीला लागून पुढे लॉ कॉलेज जवळून कॉलरी रोड मार्गे वनराजीव महाविद्यालयापर्यंत व्हावी. त्यासाठी हा बायपास रोड व्हावा. राज्य महामार्ग यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. तत्कालीन चंद्रपूर नगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार १९८४ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावेळी या प्रस्तावित बायपास रोडवर फक्त १४ घरे होती. त्या प्रस्तावाला धरूनच हा रिंग रोड चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पूर्ण करावा व जीवहानी टाळावी, ही याचिका सादर करण्यामागचा हेतू आहे, असे नागापुरे यांनी म्हटले आहे. आजच्या स्थितीत पूर्वीच्या प्रस्तावित बायपास रोडवर शेकडो घरे झाली आहेत. असे जर असेल तर रिंग रोडसाठी पर्याय शोधावा. मात्र शहराच्या बाहेरूनच रिंगरोड होणे गरजेचे आहे. लोकांच्या घरांचे नुकसान व्हावे, हा हेतू मुळीच नाही. मनपा पूर्वीच्या नगर परिषदेच्या विलंबामुळे आजची स्थिती कदाचित उद्भवली असेल, असेही नागापुरे यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)