रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी मुहूर्त सापडेना !
By admin | Published: October 13, 2016 02:16 AM2016-10-13T02:16:49+5:302016-10-13T02:16:49+5:30
यावर्षीच्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.
जिल्हावासी त्रस्त : पावसाने लावली रस्त्यांची वाट
चंद्रपूर : यावर्षीच्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. वर्दळीचे मुख्य मार्ग खड्डेमय झाले असून या रस्त्यांवर वाहनाचे अनेक अपघात घडत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्यांची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष करीत असून त्यांना रस्ते दुरूस्तीसाठी अद्यापही शुभ मुहूर्त सापडलेला नसल्याचे दिसून येते.
चंद्रपूर शहरासह तालुका मुख्यालयातील अंतर्गत रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. मात्र केवळ दगड व मुरूम टाकून रस्त्याची डागडुजी केली जात असल्याने दोन दिवसांतच रस्ता जैसे थे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चंद्रपूर शहरातील रामनगर चौक, बंगाली कॅम्प, वाहतूक शाखेसमोरील रस्ता पुर्णत: उखडून गेला आहे. तर गडचिरोली मार्गही मोठ्या प्रमाणात उखडला आहे. या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची डागडुजी तत्काळ होणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्षच होत असल्याचे खड््यांमुळे नागरिक हैराण झाले असून किरकोळ व मोठे अपघात घडत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
डांबरी रस्त्याला मुरूमाचा लेप
काही ठिकाणी रस्ते डागडुजीचे काम सुरू आहेत. मात्र या कामात डांबराऐवजी चक्क मुरूम व दगडाचा वापर केला जात आहे. त्यामुळे जड वाहन गेल्यास खड्ड्यातील मुरूम व दगड उखडून जाते. डांबरी चुरी व लहान लहान दगड रस्त्यावर पसरून राहत असल्याने दुचाकी वाहने घसरत असल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे डागडुजीचे काम केवळ देखावा ठरत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.