रेती तस्करांकडून एका वर्षात ८० लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:30+5:302021-06-05T04:21:30+5:30
भद्रावती शहरात तथा तालुक्यात अवैध रेती तस्करांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे तहसील प्रशासन व्यस्त असल्यामुळे ...
भद्रावती शहरात तथा तालुक्यात अवैध रेती तस्करांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे तहसील प्रशासन व्यस्त असल्यामुळे या रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे. विशेषत: ग्रामीण भागात महसूल अधिकारी तथा कर्मचारी वेळेत पोहचू शकत नसल्याने ग्रामीण भागात रेती तस्कर तयार झालेले आहे. रात्रीच्या वेळेस तालुक्यातील मांगली, चंदनखेडा, कोंढा आदी भागात मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असून या तस्करीमुळे शासनाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. महसूल विभाग हा रेती तस्करीवर लक्ष ठेऊन असून २०२१ मध्ये ७४ अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत ७५ लाख रुपयांचा तर एप्रिल २०२१ मध्ये ९ रेती तस्करांवर कारवाई करीत ५ लाख रुपयांचा असा एकूण ८० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
त्याचप्रमाणे अवैध रेती तस्करी करणाऱ्या अनेक ट्रॅक्टरचे नंबर अस्पष्ट असतात व दिसत नाही. त्याचा त्रास नागरिकांनाही होत असल्यामुळे परिवहन विभागाने शहरातील अशा ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मागणीही महेश शितोळे यांच्याकडे करण्यात आली आहे.