गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By admin | Published: June 19, 2016 12:50 AM2016-06-19T00:50:51+5:302016-06-19T00:50:51+5:30
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिवसेनेच्या...
शिवसेनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष : चंद्रपुरात सत्कार कार्यक्रम
चंद्रपूर : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून स्थानिक जैन भवन येथे कार्यक्रम पार पडला.
यावेळी व्यासपीठावर आ. बाळू धानोरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारती दुधाणी, युवासेना जिल्हा संदीप गिऱ्हे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख माया पटले, शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे, महिला आघाडी शहर प्रमुख सायली येरणे, नगरसेवक आकाश साखरकर, संदीप आवारी, योगिता मडावी, बंडू हजारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज तथा हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी बोलताना आ. बाळू धानोरकर म्हणाले, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. शिवसेना पक्षाची ५० वर्षाची यशस्वी परंपरा जपत सामाजिक बांधिलकी जोपासून प्रत्येक शिवसैनिकांने सामान्य नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या उत्थानाकरिता सदैव प्रयत्न केले आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत ते फक्त महाराष्ट्रातील मराठी माणसामुळेच. राज्याच्या जडणघडणीत शिवसेनेचा मोठा वाटा आहे. तो फक्त आपल्या शिवसैनिकांमुळेच, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक किशोर जोरगेवार यांनी केले. ते म्हणाले, राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपुरातील कोणताही विद्यार्थी देशातील कुठल्याही बाबतीत कमी नाही. येथील विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची शर्थ करु विकास साधला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणातही येथील विद्यार्थ्यांनी यशाचा कळस गाठला आहे. कष्टाची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर येथील विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करू शकतात, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले तर आभार शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेकडो गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, कार्यकर्ते उपस्थित होते.
(स्थानिक प्रतिनिधी)