अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांची ‘फायर फायटिंग’
By Admin | Published: September 26, 2015 12:56 AM2015-09-26T00:56:17+5:302015-09-26T00:56:17+5:30
राज्यशासनाने २००६ मध्ये जीव सुरक्षा कायदा अंमलात आणला. तब्बल नऊ वर्षानंतर मनपा प्रशासन या कायद्याची शहरात अंमलबजावणी करीत आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता : चतुर्थ कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा भार
चंद्रपूर : राज्यशासनाने २००६ मध्ये जीव सुरक्षा कायदा अंमलात आणला. तब्बल नऊ वर्षानंतर मनपा प्रशासन या कायद्याची शहरात अंमलबजावणी करीत आहे. मनपा अग्निशमन विभागाचा डोलारा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरु आहे. त्यामुळे हे अप्रशिक्षित कर्मचारी फायर फायटिंगसाठी दोन हात कसे करणार, असा प्रश्न मनपाच्याच नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. मात्र, या प्रश्नावर महापौरांसह आयुक्त अनुत्तरीत झाल्याने फायर फायटिंगच्या यशस्वी अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरात अनेक ठिकाणी अवैध इमारती बांधण्यात आल्या आहेत. गल्लीबोळात डॉक्टरांनी दवाखाने थाटून व्यवसाय सुरु केला आहे. आजही अनेक डॉक्टरांनी पालिकेकडे साधी नोंदणीही केलेली नाही. त्यामुळे अवैध इमारतींवर बुलडोझर चालवून नंतर फायर आॅडीटची अंमलबजावणी केल्यास ती यशस्वी होईल, असे नगरसेविका सुनिता लोढिया यांनी म्हटले आहे. तर आता जे चतुर्थश्रेणी कर्मचारी अग्निशमन विभागात कार्यरत आहेत. त्यांना कोणतेही प्रशिक्षण नाही, सुरक्षा साधने नाहीत. त्यामुळे या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना आधी सोयी सुविधा पुरवाव्या. सोबतच प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करुन नंतरच फायर फायटिंग राबवावी, अशी मागणी बलराम डोडाणी यांनी केली. फायर फायटिंगचे काम एका एजन्सीमार्फत केले जात आहे. इमारत बांधकामाचे प्रमाणपत्र, मालकी हक्क आणि अन्य कागदपत्रे सादर केलेल्यांना फायर फायटिंग प्रमाणपत्र दिले जाते. आतापर्यंत शहरातील ७६ नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यातील ३५ लोकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. केवळ अंतर्गत व्यवस्था म्हणून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घेतली जात आहेत. येथे कुणीही प्रशिक्षीत कर्मचारी नाही. मात्र, त्यांना सुरक्षा साधने पुरविली जात असल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकारी बेग यांनी सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)