पडोलीच्या फर्निचरच्या दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:39+5:302021-03-28T04:26:39+5:30
फोटो घुग्घुस : पडोली पोलीस ठाण्याच्या मागील महाराष्ट्र फर्निचरच्या दुकानाला शुक्रवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान आग लागून लाकडी फर्निचर ...
फोटो
घुग्घुस : पडोली पोलीस ठाण्याच्या मागील महाराष्ट्र फर्निचरच्या दुकानाला शुक्रवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान आग लागून लाकडी फर्निचर व लाकूड जळून खाक झाले. या आगीत तीन लाखांचे नुकसान झाले.
आग इतकी भयंकर होती की चंद्रपूर महानगरपालिकेची पाच अग्निशमन वाहने बोलाविण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल दोन तास लागले.
शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ७.३० वाजतादरम्यान नासीर खान रफूर खान हे दुकान बंद करून चंद्रपूर येथील नगिनाबाग येथील आपल्या घरी गेले. रात्री १० वाजताच्या सुमारास दुकानाला आग लागल्याची माहिती त्यांना भ्रमणध्वनीवरून देण्यात आली. लगेच ते पडोली येथील दुकानात पोहचले. तोपर्यंत दुकान चांगलेच जळत होते. दरम्यान, तेथील नागरिकांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले असता अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र त्यादरम्यान फर्निचर व फर्निचर बनविण्यासाठी असलेले लाकूड जाळून खाक झाले. त्यात घराचे खरेदी केलेले जुने लाकूडसुद्धा आगीत स्वाहा झाल्याची माहिती दुकान मालकाने दिली. ही आग शार्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज आहे.