ताडोबाच्या बफर क्षेत्रात आग
By admin | Published: May 3, 2016 01:05 AM2016-05-03T01:05:54+5:302016-05-03T01:05:54+5:30
ताडोबाच्या बफर क्षेत्रात सोमवारी दुपारी अचानक आग लागली. सुमारे सहा हेक्टर क्षेत्र आगीच्या विळख्यात सापडले.
चंद्रपूर : ताडोबाच्या बफर क्षेत्रात सोमवारी दुपारी अचानक आग लागली. सुमारे सहा हेक्टर क्षेत्र आगीच्या विळख्यात सापडले. दरम्यान, ताडोबातील कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर हालचाली करून आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत केवळ ताडोबातील गवत जळून खाक झाले.
ताडोबाच्या मोहर्ली गेटच्या अलिकडे महाऔष्णिक वीज निर्मीती केंद्राने संपादित केलेली सुमारे पाच हेक्टर जमिन आहे. इरई धरणाचे बॅक वॉटरही याच परिसरात असल्याने या भागात गवत आणि अन्य वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. सोमवारी दुपारी अचानक या परिसरात आग लागली. पाहता-पाहता ही आग पसरत जाऊन सीटीपीएसच्या मालकीची पाच हेक्टर व ताडोबाच्या एक हेक्टर जमिनीवरील गवत आगीच्या विळख्यात सापडले. याची माहिती मिळताच, ताबोडातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आग विझविण्याचे काम हाती घेतले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक गणपत गरड यांनी ‘लोकमत’ ला दिली.