घोडपेठ येथे दोन घरांना आग
By admin | Published: April 7, 2017 12:50 AM2017-04-07T00:50:42+5:302017-04-07T00:50:42+5:30
गावाजवळच्या मोकळ्या जागेतील कचरा व झुडुपांना अचानक आग लागली. ही आग पसरत जावून गावाजवळील घरांपर्यंत पोहोचली.
अनर्थ टळला : मोकळ्या जागेतील आग पोहोचली घरात
घोडपेठ : गावाजवळच्या मोकळ्या जागेतील कचरा व झुडुपांना अचानक आग लागली. ही आग पसरत जावून गावाजवळील घरांपर्यंत पोहोचली. यात दोन घरांनीही पेट घेतला. मात्र जिवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यात मोठे नुकसान झाले.
गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावालगत असलेल्या मोकळ्या जागेत आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. यावेळी नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेचे गांभीर्य पाहता भद्रावती नगरपालिका व चंद्रपूर महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत गावातील नागरिकांनी बरीचशी आग आटोक्यात आणली होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत वाघ, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच भद्रावतीचे ठाणेदार विलास निकम आपल्या ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित झाले होते. आगीचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी २ वाजताच्या दरम्यान आग पुर्णपणे आटोक्यात आली.
गावातील किसन झालवडे व गोपाळा घोटकर यांच्या घरांना आग लागल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र गावालगतच्या मोकळ्या जागेतील एका प्लॉटधारकाने मोकळ्या प्लॉटवर साफसफाई करण्यासाठी आग लावली. मात्र आगीने मोठे रूप धारण केल्यानंतर त्या व्यक्तीने पळ काढल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)