सात दिवसांपासून धगधगतोय चंद्रपुरातील वेकोलिचा कोलडेपो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:22 PM2018-05-25T16:22:04+5:302018-05-25T16:22:13+5:30
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोवरी व सास्ती उपक्षेत्रातील कोलस्टॉक डेपोमध्ये मागील सहा दिवसांपासून आग धगधगत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोवरी व सास्ती उपक्षेत्रातील कोलस्टॉक डेपोमध्ये मागील सहा दिवसांपासून आग धगधगत आहे. शनिवारीच या डेपोंना आग लागली. वेकोलि अधिकाऱ्यांनी याबाबत माहित होताच आग विझविण्याचा थातूरमातूर प्रयत्न केला. त्यामुळे ही आग सहाव्या दिवशीही धगधगत आहे. यात वेकोलिचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
सहा दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानाही वेकोलि प्रशासनाने याबाबत गंभीर पाऊल उचललेले नाही. बल्लारपूर वेकोलि क्षेत्राअंतर्गत जवळपास सहा ते सात उपक्षेत्र असून, या क्षेत्रात उच्च दर्जाचा कोळसा उत्पादित केला जातो. जानेवारी ते मे या कालावधीत प्रत्येक उपक्षेत्राला कोळशाच्या उत्पादनाचे उद्दिष्ट दिले जाते. या कालावधीला उत्पादनाचे ‘सिझन’ असे संबोधले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त कोळसा उत्पादित केला जातो. गोवरी आणि सास्ती उपक्षेत्रात अंदाजे साडेतीनशे टन कोळशाचा साठा असल्याची माहिती आहे. जिल्ह्याचे तापमान ४७ अंशावर गेले आहे. या वाढत्या तापमानामुळे कोलस्टॉकला आपोआप आग लागत असते, असे वेकोलि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याच कारणामुळे १९ मेच्या रात्री सास्ती व गोवरी क्षेत्रातील कोलस्टॉकला अशीच आग लागल्याचे सांगितले जाते. परंतु, ती आग पूर्णत: विझविण्यास वेकोलिच्या अधिकाऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे या आगीची धग आजही कायम असून राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे.
याबाबत वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ही आग वरच्या भागाला लागली असून, कोळशाचा ढिगारा मशिनच्या साहाय्याने वेगळा करून पाण्याच्या बुलेट फायरद्वारा मारा केल्याने आग क्षणात विझविता येते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, आज आठ दिवसांचा कालावधी लोटूनही या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नाही. त्यामुळे वेकोलिचा अंदाजे ३५० लाख टन कोळसा जळून खाक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोलस्टॉकला आग लागणे म्हणजे अधिकाऱ्यांना गैरप्रकार करण्याची संधी मिळणे आहे. म्हणूनच या आगीकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याचा आरोपही होत आहे.