झरण एफडीसीएम जंगलात आगीचे तांडव
By admin | Published: April 9, 2015 01:17 AM2015-04-09T01:17:31+5:302015-04-09T01:17:31+5:30
तालुक्यातील झरण येथील वनविकास महामंडळाच्या जंगलाला आग लागल्याने वनसंपत्तीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.
आक्सापूर : तालुक्यातील झरण येथील वनविकास महामंडळाच्या जंगलाला आग लागल्याने वनसंपत्तीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. जंगल परिसरात आगीचे तांडव सुरु असताना अधिकारी मात्र या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना पाठवून आग आटोक्यात आणण्याचे फर्माण सोडून स्वत: मात्र निवासस्थानी बसून कोणतीच हालचाल करीत नसल्याची माहिती आहे.
मध्य चांदा प्रकल्पाअंर्तंगत एफडीसीएमच्या बल्लारशाह विभागात मोडणाऱ्या झरण वनपरिक्षेत्रात रविवारी सकाळपासूनच आगीचे तांडव सुरु आहे. या परिसरात लागलेल्या आगीने मार्गाच्या दोन्ही बाजूस उग्र रुप धारण करुन परिसरातील शेत शिवारावर जळत आहे.
सध्या उन्हं तापत असल्याने लागलेल्या आगीला अधिक पोषक वातावरण प्राप्त होऊन ही आग जास्त पसरत आहे. वनपरिक्षेत्र झरण मधील कक्ष क्रमांक १२३ व ७५ मध्ये आग विझविण्यासाठी वनपरिक्षेत्राधिनस्त कर्मचाऱ्यांचे बळ अपूरे पडल्याने शेवटी गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यास काही प्रमाणात यश मिळाले.
परंतु या वनपरिक्षेत्रात एकाच वेळी पाच जागी आग लागल्याने अपुऱ्या मनुष्यबळाअभावी बांबू व सागवानाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, आगीच्या घटनेची माहिती मिळूनही वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी निवासस्थान न सोडता अधिनस्त कर्मचाऱ्यांवर धुरा सोपवून आग आटोक्यात आणण्याचे फर्मान सोडल्याची माहिती आहे. (वार्ताहर)