चंद्रपुरात पुन्हा गोळीबार; कुख्यात गुंड हाजी सरवरची हॉटेलमध्ये निर्घृण हत्या
By परिमल डोहणे | Published: August 12, 2024 08:46 PM2024-08-12T20:46:25+5:302024-08-12T20:46:54+5:30
चंद्रपूर हादरले; शहरातील मध्यभागी असलेल्या बिनबा गेट परिसरातील थरार
चंद्रपूर : गोळीबाराने चंद्रपूर जिल्हा हादरला असतानाच भर दुपारी शहरातील बिनबा गेट परिसरात असलेल्या हॉटेल शाही दरबारमध्ये चंद्रपुरातील कुख्यात गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर याच्यावर गोळीबार केला. दोन गोळ्या लागल्यानंतर हाजी सरवर हॉटेलमधील किचनकडे पळू लागला. यावेळी त्याला चाकूने भोसकले. तो खाली कोसळताच त्याचा चाकूने गळा चिरला. यावेळी हाजीच्या साथीदारालाही एक गोळी लागली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. रक्तबंबाळ अवस्थेत हाजीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे चंद्रपूर शहर पुन्हा एकदा हादरून गेले आहे. सततच्या गोळीबाराच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याची माहिती आहे.
सोमवारी दुपारी शहरातील शाही दरबार हॉटेलमध्ये हाजी सरवर आपल्या साथीदारांसह जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण करत असताना त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात आरोपींनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात हाजी याला दोन गोळ्या लागल्या. तशाच अवस्थेत तो हॉटेलमधील किचनकडे पळू लागला. यावेळी त्या आरोपींनी हॉटेलमध्ये प्रवेश करून त्याच्यावर चाकूने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली कोसळला. यावेळी आरोपींनी चाकूने त्याचा गळा चिरला. अन् घटनास्थळावरून पळ काढला. हॉटेल चालकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान तेथील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कोंडावार, शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आसीफराजा शेख व पोलिसांच्या चमूने घटनास्थळ गाठले होते.
बॉक्स
कोण होता हाजी सरवर?
कोळसा माफियातील कुख्यात गुंड म्हणून हाजी सरवरची विदर्भात ओळख होती. त्याच्या जिल्ह्यातील विविध ठाण्यांत खंडणी वसुली, हत्या, सुपारी देऊन मारपीट करणे, आरोपींना शरण देणे आदी गुन्हे दाखल होते. त्याच्यावर तडीपार, मोक्कासारखी कडक कारवाईसुद्धा झाली होती. मागील काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारीचे साम्राज्य पसरविण्यास सुरुवात केली होती.