चंद्रपूर जिल्ह्यातील बॉटनिकल गार्डनमध्ये साकारतेय राज्यातील पहिले थ्रीडी प्लॅनेटोरियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:04 PM2019-09-14T12:04:06+5:302019-09-14T12:04:39+5:30
१६ जून २०१५ च्या महसुल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्हयातील विसापूर येथे जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारण्याचा निर्णय झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर विसापूर गावानजिक निमार्णाधीन असलेल्या देशातील अत्याधुनिक बॉटनिकल गार्डनमध्ये राज्यातील पहिल्या थ्रीडी प्लॅनेटोरीयम अर्थात तारांगणाच्या निमीर्तीसाठी १४ कोटी २१ लक्ष ६३ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून ११ सप्टेंबर २०१९ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
१६ जून २०१५ च्या महसुल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्हयातील विसापूर येथे जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारण्याचा निर्णय झाला आहे. सदर प्रकल्पाची योजना राबविण्याकरिता राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था लखनौर या संस्थेची प्रकल्पाच्या तांत्रिक कामात मदत घेतली जात आहे. फुलांचे निर्जलीकरण तंत्र व त्याबाबतचे प्रशिक्षण हे संस्थेच्या सहभागाचा मुख्य भाग आहे. तसेच सायकॅड हाऊस, हर्बेरिअम, बीज संग्रहालय, बोन्साय गार्डन, कॅना गार्डन, बोगनवेलीया गार्डन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हयातील आदिवासी व गरीब लोकांना जगण्याचे साधन निर्माण होणार आहे. तसेच वनविभागामार्फत रोपवन कामे, निरीक्षण पथ, जल व मृद संधारणाची कामे, वॉट टावर पूल, रस्ते, जलाशय, सुशोभीकरण, सिमेंट नाला बांध, ट्री हाऊस इतर कामे प्रगतीपथावर आहेत. या बॉटनिकल गार्डनसाठी आतापर्यंत १७० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
देशातील अत्याधुनिक अशा या बॉटनिकल गार्डनच्या सौंदर्यात अधिक भर घातली जाणार आहे. ती या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्लॅनेटोरीयममुळे. डिजीटल इलेक्ट्रॉनिक प्रणालीच्या माध्यमातुन उभारण्यात येत असलेले हे प्लॅनेटोरीयम राज्यातील पहिले थ्रीडी प्लॅनेटोरीयम ठरणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने साकारात असलेले जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन व त्यात उभारण्यात येणाºया तारांगणामुळे चंद्रपूर जिल्हयाचे नाव आता जागतीक पातळीवर अधोरेखित होणार आहे.