१९५९-६० ला गुंफास्थळी झाला पहिला महोत्सव
By admin | Published: December 30, 2014 11:30 PM2014-12-30T23:30:18+5:302014-12-30T23:30:18+5:30
बाल माणिक यांचे गोंदेडा (गुंफा) ता. चिमूर येथे वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर १९२४ मध्ये आगमन झाले. ते आॅक्टोंबर १९२६ पर्यंत येथे वास्तव्यास होते. दरम्यान, सन १९२४-२५ व २६ या काळात
रमेश नान्ने - पेंढरी(कोके)
बाल माणिक यांचे गोंदेडा (गुंफा) ता. चिमूर येथे वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर १९२४ मध्ये आगमन झाले. ते आॅक्टोंबर १९२६ पर्यंत येथे वास्तव्यास होते. दरम्यान, सन १९२४-२५ व २६ या काळात तुकडोजी महाराज यांनी गुंफास्थळी साधना केली. १९ मार्च १९२७ रोजी त्यांनी आनंदामृत नावाचा आध्यात्मिक पहिला ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला. त्यानंतर तुकडोजी महाराज यांनी सन १९५९-६० मध्ये पहिल्यांदा यात्रा महोत्सव गुंफास्थळी सुरु केला.
९ जानेवारी १९६० ला पहिला घुगरी गोपालकाला केला आणि तोही पौष पोर्णिमेला पूर्ण चंद्राकृतीला साक्षी ठेवून. यामागे त्यांचा उद्देश असा होता की, चंद्रप्रकाशात भाविकांना रात्रीचा कार्यक्रम व उपक्रमाचा आस्वाद घेता यावा. जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज सुधारणा, संघटन, शिक्षण, सर्वधर्म समभाव आदींचा प्रसार हा देखील यामागील उद्देश आहे. या यात्रेचे सुरुवातीचे स्वरूप लोकात जावून भजन- कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन करणे, भौतिक तसेच आध्यात्मिक स्वरूपात सामाजिक सुधारणा इत्यादी बाबी अंतर्भुत होत्या. त्यानंतर ६ ते ९ जानेवारी १९६३ या दरम्यान राष्ट्रसंतांच्या उपस्थितीत यात्रा महोत्सव संपन्न झाला. यामध्ये गीताचार्य तुकाराम दादा, राजे विश्वेश्वरराव आत्राम, राष्ट्रसंतांचे सहकारी गुरुकुंजचे शामराव दादा मुकदम आदी विभुती हजर होती.
सन १९६३ ला एकाच वर्षी दोन पौष पोर्णिमा आल्यामुळे १९६४ ची यात्रा महोत्सव हा २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर १९६३ या दरम्यान झाला. यावेळीही महाराज तीन दिवस तपोभूमीत मुक्कामी होते. या महोत्सवात मुंबईचे अभिनेते शाहू मुळक, तत्कालिन विधानसभा सभापती आध्यात्मिक विचारवंत बाळासाहेब भारदे, शिक्षण उपमंत्री डॉ. कैलास यांचे मार्गदर्शन, हभप खंडारे व सावजी महाराज यांचे कीर्तन तथा हभप मोझरकर महाराज यांचे प्रवचन झाले होते. १५ जानेवारी ते १७ जानेवारी १९६५ च्या यात्रा महोत्सवातही राष्ट्रसंत तीन दिवस मुक्कामी होते.
२४ ते २६ जानेवारी १९६७ च्या यात्रा महोत्सवादरम्यान विधानसभेच्या सार्वजनिक निवडणूका आल्या. त्यावेळेस राष्ट्रसंतांनी सर्वपक्षीय उमेदवारांना यात्रेच्या एकाच व्यासपीठावर आणले. हा संदर्भ ३ फेब्रुवारी १९६७ अनेक वृत्तपत्रांनीही दिला होता. १३ ते १५ जानेवारी १९६८ च्या यात्रा महोत्सवादरम्यानचा महाराजांचा मुक्काम अखेरचा ठरला.