चंद्रपुरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल; तीन दिवसांत १७ देशी-विदेशी चित्रपटांची पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 12:04 PM2023-03-11T12:04:47+5:302023-03-11T12:07:58+5:30
चंद्रपूर येथील मिराज सिनेमा, एमडीआर मॉल येथे आयोजन; आज उद्घाटन
चंद्रपूर : वाघांचे अधिराज्य असलेल्या चंद्रपुरातील भूमीतही चित्रपटांची निर्मिती व्हावी, येथील कलावंतांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन होत आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्यविभाग आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ मार्च २०२३ या तीन दिवसात चंद्रपूर येथील मिराज सिनेमा, एमडीआर मॉल येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
११ मार्चला सायंकाळी पाच वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेनेनिर्मित तसेच जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित ‘पंचक’ या मराठी चित्रपटाने होणार आहे. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) चे माजी अधिष्ठाता समर नखाते उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील चित्रपटप्रेमींनी तीन दिवसीय फिल्म फेस्टिव्हलचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.
१७ चित्रपटांचा लुटता येणार आनंद
तर १२ आणि १३ मार्चला प्रत्येकी आठ-आठ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. १७ चित्रपटांमध्ये सहा भारतीय चित्रपट आहेत. यात ‘पंचक’, ‘मदार’ आणि ‘टेरीटरी’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. ‘टेरीटरी’ हा मराठी चित्रपट वाघांच्या अधिवासावर आधारीत असून चंद्रपूर येथील सचिन मुल्यमवार व स्थानिकांनी हा चित्रपट बनविला आहे.
तीन भारतीय चित्रपटांमध्ये निहारीका (बंगाली), टोरांज हजबंड (आसामी) आणि बिगीनिंग (तामीळ) यांचा समावेश आहे. तर विदेशी चित्रपटांमध्ये जर्मनी, फ्रान्स, कतार, चिली, अर्जेंटिना, पॅलेस्टाईन, कॅनडा, बेल्जियम, डेन्मार्क आणि इराण या देशांतील चित्रपट त्यांच्या मूळ भाषेत आणि इंग्रजी भाषेसह दाखविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व १७ चित्रपट अप्रदर्शित आहेत. त्यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच चंद्रपूरच्या नागरिकांना या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे.