आधी पगार द्या; नंतरच मशिनरीज हलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:21 AM2017-12-22T00:21:23+5:302017-12-22T00:21:34+5:30
कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन न देता जुना कुनाडा कोळसा खाणीतून आपल्या मशिनरी इतरत्र हलविण्याच्या प्रयत्नात असलेल्या धनसार इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीचा प्रयत्न संतप्त कामगारांनी हाणून पाडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन न देता जुना कुनाडा कोळसा खाणीतून आपल्या मशिनरी इतरत्र हलविण्याच्या प्रयत्नात असलेल्या धनसार इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीचा प्रयत्न संतप्त कामगारांनी हाणून पाडला. आधी वेतन द्या, नंतरच मशिनरीज हलवा, असा भूमिका घत कामगारांनी कुनाडा खाण परिसरात ठिय्या दिला. हा प्रकार गुरुवारी घडला.
जिल्ह्याचे कामगार आघाडीचे नेते उमेश बोढेकर यांच्या नेतृत्वात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. संतप्त कामगारांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता कंपनीच्या अधिकाºयांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी समस्या निवारण्यासाठी मध्यस्थी केली. परंतु झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. कोणत्याही परिस्थितीत वेतन मिळाल्याशिवाय मशिनरीज इतरत्र हलवू देणार नाही, असा पवित्रा कामगारांनी कायम ठेवल्याने खाण परिसरात तनावपूर्ण स्थिती आहे. कामगारांनी समस्या सोडविण्यासाठी उमेश बोढेकर यांच्या नेतृत्वात बैठक घेतली. बैठकीत धनसार कंपनीचे अधिकारी चंद्रमा सिंग, व्यवस्थापक अनुप पोटे, वेकोलिचे आरमुगम आदी उपस्थित होते. कामगारांचे वेतन तत्काळ देवून या प्रकरणाचा निपटारा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापही त्यावर धनसार कंपनीने निर्णय घेतलेला नाही.