ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना केंद्रात मतदानासाठी प्रथम प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 11:56 AM2024-11-20T11:56:38+5:302024-11-20T11:58:45+5:30
मतदानासाठी थेट प्रवेश : मतदान केंद्रात राहणार आरोग्य कीट
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विधानसभा सार्वत्रिक 5 5 निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि. २०) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यात ९४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. मतदान प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाहण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा, पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला अथवा दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपला मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी ६ वाजता संपला असून या कालावधीनंतर आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी भरारी पथके, स्थिर निगराणी पथके अधिक गतीने कार्यरत करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील २ हजार ७७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. प्रत्येक पथकात मतदान केंद्राध्यक्ष, प्रथमस्तरीय मतदान केंद्र अधिकारी आणि दोन इतर मतदान केंद्र अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. प्रत्येक केंद्रावर मतदारांच्या मदतीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपलब्ध राहाणार आहेत. तसेच प्रथमोपचार कीटही मतदान केंद्रावर राहणार आहे.
या राहणार सुविधा
- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मत केंद्रांवर पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, सावलीसाठी मंडप, वयोवृद्ध गरोदर महिलांना बसण्यासाठी खुर्ची यासारख्या किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- वयोवृद्ध, गरोदर महिलांना रांगेत उभे न करता प्रथम प्राधान्याने प्रवेश देऊन त्यांचे मतदान करून घेण्यात येणार आहे.
- निवडणूक, मतदान विषयक तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे