आधी क्वारंटाईन हो, मग घरात घेते... शेकडो किलोमीटर चालून आलेल्या मुलाला आईने नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:31 PM2020-05-14T18:31:04+5:302020-05-14T18:31:33+5:30
कोरोनाने अख्या जगात कहर केला आहे. हजार किलोमीटरवरुन आलेल्या पोटच्या गोळ्याला आईने घरात नाकारलं.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोटाची खळगी भरण्याकरिता वणवण भटकणारा जीव संकटात सापडलाय. ग्रामीण भागात कामाची कमतरता असल्याने कामाच्या शोधात औरंगाबाद येथे गेलेल्या एका परिवाराची व्यथा. औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढलेला. प्रादुर्भाव पाहता लागलेली गावाची ओढ, राहवली नाही. अखेर गोंडपिपरी तालुक्यातील तारसा या स्वगावी काल दि.13 रोजी तो परत आला. परत आल्यावर त्याला झालेलं दु:ख तो आयुष्यात कधीच विसरणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कोरोनाने अख्या जगात कहर केला आहे. हजार किलोमीटरवरुन आलेल्या पोटच्या गोळ्याला आईने घरात नाकारलं. गावकऱ्यांनीसुद्धा त्याचा तिरस्कार केला. पिण्यासाठी कुणी पाणीही देत नव्हते. स्वत: आपल्या परिवारासह विलगीकरणात राहायला तयार असताना त्याला शाळा उघडून देण्यासाठी ग्रामपंचायतीने नकार दिला. आपल्या छोट्याश्या मुलीला घेऊन तब्बल तीन तास लखलखत्या उन्हात त्याला ताटकळत उभ राहावं लागलं. पिण्यासाठी पाणी नाही. भुकेने व्याकुळ अशी अवस्था होती. अखेर त्याने दोन भिंतीच्या मधे चादर बांधून तात्पुरता निवारा बनविला आणि विसावा घेतला. असे विदारक वास्तव त्याच्या नशिबी आले. तब्बल तीन तासानंतर गोंडपिपरी ठाणेदाराच्या मध्यस्तीने त्याला राहण्यासाठी शाळा मिळाली. अखेर आईची माया ही वेगळीच. काही वेळाने आईनेच जेवणाचा डबा बनवून आणून दिला. आणि त्यांच्या पोटाला आधार मिळाला.