सिंदेवाहीतील पहिली शाळा जीर्ण; धोकादायक स्थितीत ज्ञानार्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 12:17 PM2024-07-27T12:17:26+5:302024-07-27T12:20:14+5:30
शाळेचे कवेलू फुटले असून त्यातून गळते पाणी : विध्यार्थ्यांच्या जीवाला धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : तालुक्यातील सिंदेवाही शहरातील सर्वांत जुनी व पहिली शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ सिंदेवाहीची ओळख आहे. मात्र या शाळेच्या जीर्ण इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेच्या जीर्ण इमारतीमध्ये धोकादायकरीत्या धडे घ्यावे लागत आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात शाळेची इमारत सन १९५० या वर्षात बांधण्यात आली होती. जिल्हा परिषद क्रमांक १ येथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेतील छत गळत आहे. कवेलू फुटले आहे. स्लॅबचे खिपले गळून एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडण्याची शक्यता आहे.
या संबंधाने प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या दरबारी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु, कोणतीही दखल घेण्यात आली नाही, असा आरोप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ सिंदेवाहीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एम. बी. मेश्राम यांनी केला. गुरुवारी शाळेत अध्यक्ष व पालकांनी बैठक घेतली. तसेच तत्काळ कार्यवाही न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा या बैठकीत घेण्यात आला.
"शासन व प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात. अन्यथा शाळेला कुलूप लावण्यात येईल. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदारी सरकार, पालकमंत्री, आमदार यांची राहील."
- अमोल कुचनवार, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सावली
"शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सर्वांत जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक-१ असून, आमचे मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. शाळा मोडकळीस आली आहे. त्यामुळे मुलांचा जीव धोक्यात आला. शासनाने निधी उपलब्ध करून लवकरात लवकर नवीन इमारतीचे बांधकाम करावे."
- सुधीर ठाकरे, पालक