चंद्रपुरात प्रथमच ‘श्री संत गजानन गौरव गाथा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:21 PM2018-12-25T22:21:18+5:302018-12-25T22:21:45+5:30
विदर्भाची पंढरी शेगावीचा राणा गजानन म्हणजेच माऊली श्री संत गजानन महाराज यांच्या अध्यात्म, शिकवण व विचारांवर प्रकाश टाकणारी गौरव गाथा व संगीत संध्या कार्यक्रम पहिल्यांदाच चंद्रपुरात होत आहे. दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजतापर्यंत येथील चांदा क्लब ग्राऊंडवर हे भव्य आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री संत गजानन गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विदर्भाची पंढरी शेगावीचा राणा गजानन म्हणजेच माऊली श्री संत गजानन महाराज यांच्या अध्यात्म, शिकवण व विचारांवर प्रकाश टाकणारी गौरव गाथा व संगीत संध्या कार्यक्रम पहिल्यांदाच चंद्रपुरात होत आहे. दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजतापर्यंत येथील चांदा क्लब ग्राऊंडवर हे भव्य आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री संत गजानन गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी दिली.
या कार्यक्रमाला संत गजानन महाराज यांचे ज्यांच्या घरी वास्तव लाभले असे नागपूर येथील मुधोजी राजे भोसले यांची विशेष उपस्थिती लाभणार आहेत. संत गजानन महाराजांची गौरथ गाथा अकोला येथील गजानन महाराज यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक सुनील देशपांडे व औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज यांच्या जीवनावरील साहित्य लेखक श्रीधर वक्ते उपाख्य स्वामी दिव्यानंद सरस्वती सांगणार आहेत. गीत गजानन हा संगीतमय कार्यक्रम निरंजन बोबडे आणि संच सादर करणार आहेत. चंद्रपूरात पहिल्यांदाच व्यापक स्वरुपात होत असलेल्या या कार्यक्रमाला संत गजानन महाराज यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून श्रींच्या पालखींच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी सायंकाळी ५ वाजतापर्यंत गजाननभक्त पोहचणार आहे. विशेष म्हणजे, आयोजन समिती या पालखीचे प्रवेशद्वारावर स्वागत करणार आहे. यामध्ये वडगाव येथील गजानन महाराज मंदिर, बाबूपेठ येथील महादेव मंदिर व सिस्टर कॉलोनी येथून निघणाऱ्या श्रींच्या पालखीचा समावेश असणार आहे. श्री संत गजानन महाराज गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जंयत मामीडवार व सचिव पी. आर. देशमुख यांच्यासह अविनाश उत्तरवार, किशोर बोधे, नितीन नक्षिणे, राजेंद्र तुम्मेवार, समीर तातावार, रंजना नागतोडे, शुभम डांगे, बंडू पोटे, सचिन चिंतावार, चैताली खटी, प्रिया चौधरी, सुनंदा चिंतावार, संदीप देशपांडे, किशोर गोगुलवार, अमोल सांबरे, छबुताई वैरागडे, मूलचे डॉ. कुळकर्णी, भाऊराव ढोके, केशव मत्ते, मधुकर झाडे आदी मंडळी जय्यत तयारीला लागली आहेत.
श्रींच्या साहित्यावर होणार जागर
संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे असंख्य भक्तगण जात असतात. तेथील शिस्त, प्रसन्न वातावरण, योग्य व्यवस्थापन, कुठेही आवाज नाही. प्रत्येकांच्या चेहºयावर सेवेचा भाव. हेवेदावे नाही. ओढताण नाही. कुणाला काहीही न सांगता सारेकाही सुरळीत सुरू असते. या परिसरात गेल्यानंतर भक्तही प्रसन्न होऊनच बाहेर पडतो. यामागेही संत गजानन महाजारांचीच शिकवण, त्यांचे विचार, आचार आहे. त्यात अध्यात्मही आहे. हे कसे काय घडते. गौरव गाथाच्या माध्यमातून महाराजांची एक वेगळी ओळख भक्तांना व्हावी, महाराजांच्या साहित्यावरही प्रकाश पडावा, यातूनच ही संकल्पना पुढे आली.