मिनी मंत्रालयावर पहिल्यांदाच महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:00 AM2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:20+5:30
जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात शनिवारी दुपारी १ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेत भाजपचे ३६ आणि काँग्रेसचे २० सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडून अध्यक्षपदासाठी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदासाठी रेखा कारेकार यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी वैशाली शेरकी व स्मिता पारधी तर उपाध्यक्षपदासाठी डॉ. सतीश वारजूकर व खोजराज मरस्कोल्हे यांनी नामांकन दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर भाजपने स्वबळावर कमळ फुलवत आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखण्यात भाजप नेते माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निर्विवाद यश आले. अध्यक्षपदी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदी रेखा कारेकार विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या राजकीय इतिहासात दोन्ही पदांवर महिला विराजमान झाल्याची ही पहिलीच घटना आहे. काँग्रेसने अखेरपर्यंत मोर्चेबांधणी केली होती. मात्र, भाजपने हा प्रयत्न हाणून पाडला.
जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात शनिवारी दुपारी १ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेत भाजपचे ३६ आणि काँग्रेसचे २० सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडून अध्यक्षपदासाठी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदासाठी रेखा कारेकार यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी वैशाली शेरकी व स्मिता पारधी तर उपाध्यक्षपदासाठी डॉ. सतीश वारजूकर व खोजराज मरस्कोल्हे यांनी नामांकन दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मूलचे उाविभागीय अधिकारी महादेव खेडकार यांनी नामांकन अर्जांची छानणी झाल्यानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली. यानंतर उमेदवाराच्या समर्थनात हात उंचावून मतदान करण्याचे जाहीर करण्यात आले.
मात्र, निवडणुकीच्या दहा मिनिटाअगोदर काँग्रेसचे सदस्य डॉ. सतीश वारजूकर व स्मिता पारधी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या संध्या गुरनुले यांना ३६ तर काँग्रेसच्या वैशाली शेरकी यांना २० मते तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार रेखा कारेकार यांना ३६ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे खोजराज मरस्कोल्हे यांना २० मते मिळाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महादेव खेडकर यांनी अध्यक्षपदी भाजपच्या संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदी रेखा कारेकार यांची निवड झाल्याची घोषणा केली. निकाल जाहीर होताच भाजपच्या समर्थकांनी जि.प.च्या परिसरात जल्लोष केला.
भाजपच्या शिस्तबद्ध प्रयत्नांचे फलित
आरक्षण जाहीर झाल्यापासूनच भाजपने आपल्या ३६ सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न केले होते. काही नाराज सदस्य विरोधकांच्या गळाला लागू नये, याकरिता अखेरपर्यंत खबरदारी घेतली. शिवाय, सर्व सदस्यांची कुटुंबासह हैदराबाद पर्यटनवारीही घडवून आणली. परिणामी, भाजपला जिल्हा परिषदेचा गड कायम राखता आला.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
भाजपचे पक्षश्रेष्ठी व सर्व सदस्यांनी माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. या संधीचे मी सोने करण्याचा प्रयत्न करेन. भाजपचे गटनेते देवराव भोंगळे यांच्यासह सदस्यांना विश्वासात घेऊन विकासकामांना प्राधान्य देईन. ग्रामीण भागात रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण व पाणी या मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणार आहे.
- संध्या गुरूनुले, अध्यक्ष जि. प.
विकास हेच ध्येय
जि. प. च्या उपाध्यक्षपदाची मला पहिल्यांदाच संधी मिळाली. याकरिता भाजपचे पक्षश्रेष्ठी व सर्व सदस्यांचे मी आभार मानते. अडीच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार आहे. विविध कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहे.
- रेखा कारेकार, उपाध्यक्ष जि. प.
महिला शक्तीचा मी सन्मानच करतो. मात्र, जि. प. च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोनही पदांवर महिलांना संधी देण्यात आली. भाजपने अनुभवी सदस्यांना डावलले. त्यामुळे यापुढे जिल्ह्याचा विकास खुंटणार आहे.
- डॉ. सतीश वारजूकर,
गटनेता काँग्रेस.
जनतेला उत्तम सेवा देतील - सुधीर मुनगंटीवार
जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला. याआधी देवराव भोंगळे व कृष्णा सहारे तसेच सर्व सदस्यांनी ग्रामीण जनतेपर्यंत विकास पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. आता संध्या गुरनुले व रेखा कारेकार यांच्या रूपाने महिलाराज आले आहे. हे महिलाराज अडीच वर्षात सर्वोत्तम सेवा जनतेला देतील. या निवडणुकीमुळे जिल्ह्यात काँग्रेस-राकाँ-शिवसेना महाविकास आघाडीला झटका बसला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही १५ पैकी ८ पंचायत समित्यांवर सभापती व उपसभापती तर दोन पंचायत समित्यांवर भाजपाचे दोन उपसभापती विजयी झालेत. चंद्रपूर महानगर पालिकेतही भाजपने विजय मिळवला. आता जिल्हा परिषदेवर भाजपने विकासाचे कमळ फुलवले आहे.