विषारी पाण्यामुळे तलावातील मासोळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:41 AM2019-09-02T00:41:16+5:302019-09-02T00:41:50+5:30
सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : तालुक्यातील नान्होरी येथील दोन हेक्टर २८ आर जागेवर पसरलेल्या पंचगंगा मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या तलावात धानपिकावर फवारणी करण्यात आलेले विषारी औषधीयुक्त पाणी आल्याने तलावातील लाखो रुपयांच्या मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळे सोसायटीचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत.
त्यामुळे त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ मृत्युमुखी पडलेल्या मास्यांचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सोसायटीच्या सभासदांनी केली आहे.
तलावाच्या आजूबाजूला असलेल्या अज्ञात शेतकऱ्याच्या शेतातील फवारणी करण्यात आलेले औषधीयुक्त पाणी तलावात आल्याने सदर मास्यांचा मृत्यू झाला असल्याचे सोसायटीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.
तीन-चार दिवसाआधी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पाणी अधिक वाढल्याने सदर औषधीयुक्त पाणी तलावात आले आणि सदर औषधीयुक्त पाणी तलावाच्या पाण्यात मिसळले. त्यामुळे तलावात सोडण्यात आलेल्या मास्यांचा मृत्यू झाला, असे सोसायटीच्या सदस्यांचा आरोप आहे.
दरम्यान, सरपंच, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत मृत्युमुखी पडलेल्या मास्यांचा पंचनामा करण्यात आला असून सदर पंचनाम्याची प्रत मत्सव्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे सोसायटीच्या सभासदांनी सांगितले आहे.