जिल्ह्यातील मासेमारी संकटात
By admin | Published: August 23, 2014 01:41 AM2014-08-23T01:41:46+5:302014-08-23T01:41:46+5:30
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे पाण्याने दुभिक्ष्य निर्माण झाले आहे.
भेजगाव : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे पाण्याने दुभिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरीत परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. अनेक ठिकाणच्या तलाव, बोडी, नदी नाल्यामधील जलसाठा अत्यंत कमी असल्याने मासेमारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय संकटात असून मासेमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडल्याने नदी, नाले, तलाव, बोड्या व इतर जलसाठ्यात पाणी नाही. परिसरात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असून मासेमारी संस्था कार्यरत आहेत. मात्र सध्यास्थितीत निर्माण झालेली परिस्थिती संस्थाना चिंतेत टाकणारी आहे. गेल्या दोन ते चार वर्षातील कमी पर्जन्यमान व उन्हाळ्यातील प्रचंड तापमाने तलावातील पाण्याचा साठा आवश्यकतेपेक्षा कमी झाला आहे. तीव्र उष्णतेमुळे कमी पाण्यातील मत्स्यबीज नष्ट झाल्याने तीन वर्षापासून भेजगाव येथील मासेमारी संस्था शासनाकडून कोणतेही आर्थिक सहाय्य दिले जात असताना त्यांना मिळणाऱ्या थोड्याफार आर्थिक लाभावर मस्यबीज खरेदी करावे लागले. त्यातला त्यात बीज कंपन्याकडून सुद्धा संस्थेची फसवणूक होत असल्याने अर्धेअधिक मस्यबीज सुरुवातीलाच नष्ट होतात. उरलेल्याची योग्य वाढ होत नाही. त्यातही बीजच्या वाढीसाठी अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे मुदतीपूर्वी मासेमारी करुन नाईलाजाने बाजारात विक्री करावी लागते. अनेक मासेमारी सहकारी संस्था तोट्यात आहेत. भेजगाव मासेमारी संस्थेकडे सध्या रानतलाव,सितला तलाव, पीपरी दीक्षित तलाव, भंजाठी तलाव, रंगारी तलाव लिलाव तत्वावर असून त्यात पाणीसाठा अत्यल्प असल्याने खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत आहे. या संस्था आर्थिक संकटात असून सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)