गोंडपिपरीत पट्टेदार वाघाच्या कातडीची तस्करी, पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 18:29 IST2021-11-15T10:59:53+5:302021-11-15T18:29:41+5:30
पट्टेदार वाघाच्या कातडीची तस्करी करताना वनविभागाच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली. ही कारवाई रविवारी रात्रीच्या सुमारास गोंडपिपरीच्या मुख्य मार्गावर करण्यात आली.

गोंडपिपरीत पट्टेदार वाघाच्या कातडीची तस्करी, पाच जणांना अटक
चंद्रपूर :वाघाच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाच्या दक्षता पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून दुचाकीस्वारांना रस्त्यातच अडवले. त्यांच्याकडे वाघाचे कातडे आढळून आले. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रविवारी रात्रीच्या सुमारास गोंडपिपरीच्या मुख्य मार्गावर करण्यात आली.
अहेरी मार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने मृत वाघाचे अवयव येत असल्याची गोपनीय माहिती रविवारी वनविभागाच्या दक्षता पथकाला मिळाली. त्यानुसार हे पथक गोंडपिपरी येथील नवीन बस स्टँडसमोर गस्त ठेवून बसले. दरम्यान, सायंकाळी स्थानिक रोहित बारसमोर दुचाकीवर दोन जण संशयास्पद स्थितीत दिसले.
पथकाने चौकशी केली असता त्यांच्याकडे वाघाची कातडी असल्याचे आढळून आले. दोन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. सर्व आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गादेवार यांनी रात्रीच गोंडपिपरी येथील वनविभागाच्या कार्यालयात जाऊन आरोपींची चौकशी केली. चौकशी दरम्यान आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप गवसला नसल्याने आरोपींच्या नावाबाबत वनविभागाने सध्या गुप्तता बाळगली आहे.