हल्लेखोर बिबट्यासाठी लावले पाच पिंजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:04 AM2018-12-13T00:04:27+5:302018-12-13T00:05:16+5:30
मागील दोन दिवसात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने रामदेगी परिसरात पाच पिंजरे लावण्यात आले असून वनकर्मचारी सातत्याने गस्त घालत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : मागील दोन दिवसात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने रामदेगी परिसरात पाच पिंजरे लावण्यात आले असून वनकर्मचारी सातत्याने गस्त घालत आहेत.
असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प(बफर) उपसंचालक गजेंद्र नरवणे यांनी लोकमतशी बोलताना दिली होती.
सोमवारनंतर मंगळवारी पुन्हा बिबट्याने हल्ला केल्यानंतर मंगळवारी दुपारपासूनच परिसरात सुरु असलेल्या गस्तीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. परिसरात वेगवेगळ्या पाच ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून बिबट्याला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात बोकड ठेवण्यात आले आहेत. परिसरालगतच्या गावात दवंडी देण्यात येत असून त्याद्वारे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची व जंगल क्षेत्रात न वावरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोमवारपासून परिसरात व्याघ्र संवर्धन दल व वनकर्मचाऱ्यांची गस्त सुरु आहे. गस्तीदरम्यान बिबट आढळल्यास त्याला बेशुध्द करण्यात येणार आहे.
सर्व परिस्थितीवर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प(बफर)चंद्रपूरचे उपसंचालक गजेंद्र नरवणे लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सहायक वनसंरक्षक जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप दुर्गेकर, क्षेत्र सहायक मत्ते, विशाल सोनुने, वनरक्षक जुमडे, केंद्रे, खडसंगी कार्यलयाअंतर्गत सर्व वनमजूर, व्याघ्र संवर्धन दलाचे पथक तैनात असून यासाठी पोलीस विभागाचीही मदत घेण्यात आली आहे. ठाणेदार कृष्णा तिवारी व पोलीस कर्मचारीही तैनात आहेत.
मंगळवारच्या घटनेनंतर घटनास्थळ परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट कैद झाला असून टेकडी परिसरातच त्याचा वावर आहे. त्यामुळे गस्त वाढविण्यात आली आहे.
- विशाल सोनुने ( क्षेत्र सहायक)
वनपरिक्षेत्र कार्यालय(बफर), खडसंगी.