जिल्ह्यात आजपासून पाच दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:53+5:302021-04-21T04:28:53+5:30

चंद्रपूर : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिल ...

Five days public curfew in the district from today | जिल्ह्यात आजपासून पाच दिवस जनता कर्फ्यू

जिल्ह्यात आजपासून पाच दिवस जनता कर्फ्यू

Next

चंद्रपूर : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिल व २८ ते १ मे या कालावधीत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. याची अंमलबजावणी म्हणून बुधवारपासून सलग पाच दिवस जिल्ह्यात जनता कर्फ्यू असणार आहे.

आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. मात्र, आता पुुढील पाच दिवस भाजीपाला, किराणासह सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. केवळ पेट्रोल पंप व मेडिकल स्टोअर्स सुरू असतील.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर मंगळवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडली. यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून, पुढील काही दिवस ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत जनता कर्फ्यू ठेवला जाणार आहे. त्याला जनतेने साथ द्यावी. रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता जिल्ह्यात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढविण्यात यावी, त्यासाठी उपाययोजना करावी, आवश्यकता भासल्यास शॉर्ट टेंडर करून साहित्याची खरेदी करावी, अशा सूचना ना. वडेट्टीवार यांनी दिल्यात.

यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडाळे यांच्यासह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बॉक्स

पाच तालुक्यांत ऑक्सिजन जनरेशन प्लांट

जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, राजुरा व मूल या तालुक्याच्या ठिकाणी जंबो सिलिंडर क्षमतेचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येत आहे. त्यासोबतच जिल्ह्यात २४० बेडचे सिव्हिल हॉस्पिटल सुरू असून, ३५० बेड वाढविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १२० बेड कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्यासोबतच ब्रह्मपुरी येथे १०० बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल उभारण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. सिंदेवाहीतही ५० बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

बॉक्स

खासगी रुग्णालयांनी रेमेडिसिविरची नोंद ठेवावी

खाजगी रुग्णालयाला रेमडेसिविरचा पुरवठा करीत असताना जिल्हाधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पुरवठा व्हावा. रुग्णाच्या व हॉस्पिटलच्या नावासह रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची नोंद प्रत्येक रुग्णालयाने जिल्हाधिकारी कार्यालयात करावी, असे निर्देश ना. विजय वडेट्टीवार यांनी दिलेत.

Web Title: Five days public curfew in the district from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.