पाच दिवसांच्या पावसाची जिल्ह्याला झड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:42 AM2018-08-22T00:42:58+5:302018-08-22T00:43:55+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा नदीसह अन्य लहान नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका शेतपिकाला बसला आहे. यासोबतच सावली तालुक्यात एक जिवितहानी, ब्रह्मपुरी तालुक्यात एक जनावर दगावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा नदीसह अन्य लहान नद्या व नाल्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका शेतपिकाला बसला आहे. यासोबतच सावली तालुक्यात एक जिवितहानी, ब्रह्मपुरी तालुक्यात एक जनावर दगावले. तसेच ३१९ घरांची पडझड झाली, तर १४ गोठे बाधित झाल्याचा शासकीय अंदाज आहे.
दि. १५ आॅगस्टपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले. तेव्हापासून पावसाने पिच्छा सोडलेला नाही. कधी रिमझिम, तर कधी मुसळधार अशी संततधार सुरू आहे. यामुळे वर्धा पैनगंगा नदीपरिसरातील नाल्यांना आलेल्या पुराचा फटका बल्लारपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी या तालुक्यांना बसला आहे. या पाच तालुक्यातील ११ हजार ७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यातही सर्वाधिक फटका बल्लारपूर तालुक्याला बसला आहे. बल्लारपूर तालुक्यातील ४ हजार ७१० हेक्टरातील पिकांचे नुकसान झाल्याची शासकीय माहिती आहे.
जिल्ह्यात ११ हजार ७४ हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले. यामध्ये सर्वाधिक ८ हजार १५३ हेक्टरातील कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले आहेत, तर १ हजार ३१२ हेक्टरातील सोयाबीन, ८३० हेक्टरातील धानपिक व ७७९ हेक्टरातील तुर पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये २ हजार ३३५ हेक्टरात ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झाले असून ८ हजार ७३९ हेक्टरात ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्याला पूर व बॅक वॉटरचा फटका बसला. राजुरा तालुक्यात २ हजार ७७ हेक्टर, कोरपना ३ हजार १६० हेक्टर व गोंडपिपरी तालुक्यात १ हजार १२७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे मुख्य रस्त्यांची चाळणी झाली आहे.
इरईच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ
पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प समाधानकारक भरले आहे. चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पगड्डीगुड्डम, डोंगरगाव व आसोलामेंढा हे सात प्रकल्प १०० टक्के भरले आहेत, तर इरई प्रकल्पात समाधानकारक म्हणजेच ६७.३६, लालनाला ९५.७७, घोडाझरी ५३.४९ व नलेश्वर प्रकल्प ८७.८६ टक्के भरला आहे.
पांढरकवड्यात पिके कुजली
पांढरकवडा: वर्धा- पैनगंगा नदीच्या पूरामुळे पांढरकवडा परिसरातील सोयाबीन कापूस, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराचा गाळ शेतात वाहून आल्याने पिके कुजली आहे. नदीकाठावरील शेतीला सर्वात मोठा फटका बसला. शेतकरी हैराण झाले आहे. कृषी विभागाकडून पाहणी सुरु करण्यात आली. अहवाल तयार करुन पाठविणार, अशी माहिती तलाठ्याने दिली आहे.
पुरामुळे जनजीवन विस्कळीत
चिमूर : मुसळधार पावसाने तालुक्यातील शेकडो एकर शेतीला फटका बसला. पुरामुळे मंगळवारी सकाळी खडसंगी-मुरपार, भान्सुली, पिंपळगाव, डोमा, खापरी , कान्हाळगाव म्हसली, मासळ तुकुम व केसलाबोडी गावांचे मार्ग काही तास बंद होते. नागरिक व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. मुसळधार पाऊस व वादळाने काही गावांतील मातीच्या घरांची पडझड झाली आहे. चिमूर ते कांपा राष्ट्रीय महामार्गावरील जांभूळघाट शासकीय आश्रम शाळेजवळ मोठे झाड कोसळले. पुराचे पाणी वाढल्याने चिमूर-मासळ , पळसगाव-सिंदेवाही मार्ग दुपारपर्यंत बंद होते.