आदिवासी भागातील 'ते' पाच एव्हरेस्ट वीर नोकरीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 03:11 PM2021-12-08T15:11:53+5:302021-12-08T15:24:49+5:30
आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले. या पंचरत्न शौर्यविरांना शासनाकडून २५ लाख प्रत्येकी सानुग्रह अनुदान देण्यात आले व सोबतच नोकरीचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, अद्याप त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही.
दीपक साबने
चंद्रपूर : मिशन शौर्य २०१८ अंतर्गत जिवती, कोरपना तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांनी जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर केले. तत्कालीन सरकारने त्यांना नोकरीचे आश्वासन दिले होते. मात्र राज्यात संत्तातरण झाले आणि एव्हरेस्टविरांच्या नोकरीचा प्रश्न शासन दरबारी धूळ खात पडला. पाच पंचरत्नांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार गृह विभागात नोकऱ्या कधी भेटतील, या आशेवर तीन वर्षांपासून एव्हरेस्ट वीर वाट पाहत आहेत.
राज्याचे तत्कालीन अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. दयानिधी राजा यांच्या उत्कृष्ट नियोजनातून आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने मिशन शौर्य -२०१८ हे अभियान राबविण्यात आले.
या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील उपक्रमा अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती व कोरपना या अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील १० पैकी ५ विद्यार्थ्यांनी जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर केले. एव्हरेस्ट शिखरावर झेंडा रोवून देशाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या उत्तुंग कामगिरीमुळे महाराष्ट्राची, जिल्ह्याची आदिवासी विकास विभागाची, तालुक्याची मान अभिमानाने उंचावली.
अनेकांनी केला होता सन्मान
या आदिवासी गरीब विद्यार्थ्यांच्या विक्रमी कामगिरीबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, हंसराज अहिर, तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यांनी व मान्यवरांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले होते. या पंचरत्न शौर्यविरांना शासनाकडून २५ लाख प्रत्येकी सानुग्रह अनुदान देण्यात आले. शिक्षण पात्रतेनुसार गृह विभागात विशेष बाब या सदराखाली नोकरी देण्याचे आश्वासन दिले. परंतु आजपर्यंत मनीषा धुर्वे, विकास सोयाम, परमेश आडे, उमाकांत मडावी व कविदास काठमोडे हे ५ एव्हरेस्ट वीर तीन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.