ग्रामस्थांनी बुजविले पाच किमीवरील खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:52 AM2017-10-05T00:52:19+5:302017-10-05T00:52:29+5:30
विरूर (रोड) ते सुब्बई या पाच किमी लांबीच्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले होते. विद्यार्थी व नागरिकांना दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : विरूर (रोड) ते सुब्बई या पाच किमी लांबीच्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले होते. विद्यार्थी व नागरिकांना दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. संबंधित प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला सवड नव्हती. शेवटी सुब्बई येथील शिवाजी आश्रमशाळेतील महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थांनीच श्रमदानातून पाच किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रशासनाला चांगलीच चपराक दिली आहे.
राजुरापासून ३४ कि.मी. अंतरावर सुब्बई हे गाव आहे. माजी आमदार प्रभाकर मामूलकर यांचे मूळ गाव आहे. परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा येथे येतात. राजुरा-विरूर-सुब्बई मार्गाची अत्यंत दूरवस्था झालेली आहे. त्यामुळे परिसरातील ये-जा करणाºया नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रुग्णवाहिकांना खड्डे पार करताना प्रचंड कसरत करावी लागते. दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करतात. मात्र वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे काल मंगळवारी माजी जि.प. सदस्य अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात गावकरी व विद्यार्थी यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान केले. रखरखत्या उन्हातही गावकरी व विद्यार्थ्यांनी हातात फावडे, टोपल्या घेऊन पाच कि.मी. लांबीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविले. स्वत: उपस्थित राहून श्रमदान करताना प्रोत्साहित केले.
या श्रमदान अभियानात गावकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी शिवाजी आश्रमशाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, आॅटोचालक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुख्याध्यापक डी.एस. झाडे, अंगलवार, सरपंच गजानन आत्राम, बळीराम चव्हाण, बालेश पुप्पलवार, वानखेडे, नागोसे, राठोड, मोरे, प्रशांत पवार, चंदू चापले, भाऊजी जाभोर, बाबाजी डोहने, कोरवते, सोनी व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी श्रमदान करून सामाजिक आदर्श निर्माण केला.
दुर्गम भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करावे. ग्रामीण भागातील रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने दखल घ्यावी.
- प्रभाकर मामूलकर
माजी आमदार, राजुरा