पाच लाख नागरिकांनी अजूनही घेतला नाही पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:00 AM2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:00:38+5:30
जिल्ह्यात अजूनही पहिला डोस न घेणाऱ्यांची संख्या सुमारे पाच लाख असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे नागरिकांनी पहिला तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे, अशांनी दुसरा डोस घ्यावा, यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश सोमवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात १६ लाख ४१ हजार ८३० नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र आहेत. यापैकी ११ लाख ६८ हजार १२३ नागरिकांनी पहिला डोस (७१ टक्के) तर ३ लाख ६१ हजार ४०८ नागरिकांनी दुसरा डोस (२२ टक्के) घेतला आहे.
जिल्ह्यात अजूनही पहिला डोस न घेणाऱ्यांची संख्या सुमारे पाच लाख असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे नागरिकांनी पहिला तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे, अशांनी दुसरा डोस घ्यावा, यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश सोमवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत दिले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, मनपाचे अजितकुमार डोके व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र नागरिकांचे लसीकरण करण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. याचीच फलनिष्पत्ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील पाच लाखांच्यावर नागरिकांचे लसीकरण झाले. लसीचा साठा मुबलक असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
उत्कृष्ट लसीकरण करणाऱ्या गावांचा होणार सत्कार
पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर गावांची स्पर्धा होणार आहे. ९५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लसीकरण झालेली गावे यात सहभागी होऊ शकतील.
उत्कृष्ट लसीकरण करणाऱ्या गावांची निवड प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर झाल्यानंतर तालुकास्तर आणि तालुका स्तरावर निवड झालेल्या गावांचा जिल्हा स्तरावर सत्कार होईल. दि. २३ ऑक्टोबरपर्यंत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्या.