अपघाती मृत्यूनंतर पाच लाख मिळतात, कामगारांना ठाऊकच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 05:00 AM2021-11-27T05:00:00+5:302021-11-27T05:00:42+5:30
जिल्ह्यात छोट्या-मोठ्या कामासह बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. असंघटित कामगारांसाठी शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. याअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात एक लाख ३८ हजार ८६२ बांधकाम कामगारांची नोंद आहे. अनेकजण तर नोंदणीकडे किंवा नूतनीकरणाकडे कानाडोळा करतात. त्यामुळे अशा कामगारांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बांधकाम कामगारांसह असंघटित कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास पात्र लाभार्थ्यांना शासनातर्फे मदत दिली जाते. मात्र याबाबत असंघटित कामगारांमध्ये जागृती नसल्याने ते शासनाच्या कल्याणकारी मंडळाच्या योजनेपासून वंचित राहतात. आतापर्यंत अपघाती मृत्यू झालेले केवळ तीनच प्रस्ताव जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाकडे आल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात छोट्या-मोठ्या कामासह बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. असंघटित कामगारांसाठी शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. याअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात एक लाख ३८ हजार ८६२ बांधकाम कामगारांची नोंद आहे. अनेकजण तर नोंदणीकडे किंवा नूतनीकरणाकडे कानाडोळा करतात. त्यामुळे अशा कामगारांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला शासनातर्फे मदत दिली जाते. मात्र याबाबत कामगारांना माहितीच नसल्याने जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाकडे केवळ एकच प्रस्ताव आला आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर त्यांना योग्य लाभ दिला जाणार आहे.
जिल्ह्यात केवळ एक लाख ३८ हजार कामगारांची नोंदणी
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत. मात्र बहुतांशजण नोंदणी करण्याकडे तसेच नूतनीकरण करण्याकडे कानाडोळा करतात. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक लाख २० हजार बांधकाम कामगारांची नोंद आहे. मागील वर्षी शासनाकडून कोरोना काळात मदत देण्यात आल्याने हा आकडा वाढला. त्यापूर्वी अनेकजण नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष करीत होते.
योजना आहे, हेच ठाऊक नाही
जिल्ह्यात अनेक प्रकारचे कामगार आहेत. मात्र बहुतांशजण कामगार कार्यालयात नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. नोंदणीकृत कामगारांसाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीद्वारे नोंदणी करावी.
- संदीप सिडाम,
जिल्हाध्यक्ष,
असंघटित कामगार काँग्रेस, चंद्रपूर
अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख
जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या एखाद्या असंघटित कामगाराचा कामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला किंवा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा लाभ राज्य सरकारकडून दिला जातो. यासाठी कामगार विभागाकडे तशी नोंदणी व पोलीस नोंद जोडणे आवश्यक आहे.
दोन वर्षात केवळ तीनच प्रस्ताव
मागील दोन वर्षात जिल्ह्यात अपघातग्रस्त बांधकाम कामगारांचा मृत्यू प्रकरणाचे केवळ तीनच प्रस्ताव कार्यालयात सादर झाले आहे. त्यापैकी एका प्रस्तावाची पडताळणी झाली आहे. ईतर दोन प्रस्तावाची लवकरच पडताळणी करण्यात येणार आहे.
बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रीया ऑनलाईन झाली आहे. जिल्ह्यात एक लाख ३८ हजार ८६२ बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ४१ हजार कामगार जीवित नोंदीत आहेत. अपघाती मृत्यूसंदर्भातील तीन प्रस्ताव दाखल झाले आहेत. एका प्रस्तावाची पडताळणी झाली आहे. दोन प्रस्तावाची लवकर पडताळणी केली जाईल.
- जानकी भोईते, सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर