पाच हजार मेट्रिक टन धान्य राहणार सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:04 PM2018-01-08T23:04:33+5:302018-01-08T23:05:03+5:30
शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गोदामाची गरज भासते.
राजेश मडावी।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गोदामाची गरज भासते. मात्र, आर्थिक मर्यादेमुळे गोदाम बांधणे शक्य नाही. अशातच राष्ट्रीय विकास कृषी योजनेतंर्गत अनुदान देण्याचे शासनाने मान्य केल्याने पाच बाजार समित्यांना गोदाम बांधण्याची समस्या दूर झाली. बांधकाम पूर्ण झाल्यास ५ हजार मेट्रिक टन धान्य सुरक्षित ठेवता येणार आहे.
कृषी मालाला योग्य भाव मिळावा आणि व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, यासाठी माफक दरात शेतमाल साठवून ठेवण्याची तारण योजना काही वर्षांपासून सुरू केली. पण, जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांना स्वत:च्या उत्पन्नातून गोदाम बांधणे आवाक्यापलीकडचे होते. शासनाच्या विविध योजनांमधून भांडवल मिळविण्याच्या दृष्टीने समित्यांनी प्रयत्न सुरू ठेऊनही निधीअभावी शक्य झाले नाही. त्यामुळे समित्यांमध्ये जादा क्षमतेची गोदामे उभी राहू शकली नाही. काही बाजार समित्यांमध्ये गोदामेच नसल्याने शेतकºयांचा शेतमाल तारण ठेवण्यास अडचणी निर्माण होत आहे. राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत बाजार समितीमध्ये गोदाम उभारण्यासाठी २५ टक्के अनुदानावर निधी देण्यास शासनाने मंजुरी दिली. यातून पाच बाजार समित्यांमध्ये गोदामे उभी राहतील.
चंद्रपुरात १२०० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली. त्या तुलनेत सोईसुविधायुक्त गोदामाची कमतरता आहे. बाजार समितीच्या व्यवस्थापनाने राज्य शासनानेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे १२०० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी आर्थिक मदत मिळविण्यास यश आले आहे. येत्या काही महिन्यानंतर कामाला सुरूवात होणार आहे.
आठ बाजार समित्यांना गोदामांची प्रतीक्षा
पाच बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेतंर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी मिळविण्यास यशस्वी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांना तारण योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल, वरोरा, भद्रावती, नागभिड आदी पाच बाजार समित्या या योजनेचा लाभ घेण्यास पुढे सरसावल्या. मात्र, आर्थिक क्षमतेसाठी उर्वरित बाजार समित्यांवर गोदामांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.
ब्रह्मपुरीत प्रस्तावाची तयारी
धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेणाऱ्या ब्रह्मपुरी येथे बाजार समितीमध्ये गोदामाची अत्यंत आवश्यकता आहे. आर्थिक मर्यादेमुळे बांधकाम करता आले नाही. मात्र, सद्य:स्थितीत गाळ्यांचे बांधकाम सुरू असून एप्रिल २०१८ मध्ये एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.