परराज्यातून औद्योगिक वसाहतीमध्ये आलेले पाच कामगार कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:30+5:302021-08-17T04:33:30+5:30
औद्योगिक वसाहत वरोरा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये उद्योगाच्या मेंटेनन्सचे काम मिळालेल्या कंत्राटदाराने तीन दिवसांपूर्वी परराज्यातून १४५ ...
औद्योगिक वसाहत वरोरा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये उद्योगाच्या मेंटेनन्सचे काम मिळालेल्या कंत्राटदाराने तीन दिवसांपूर्वी परराज्यातून १४५ कामगार वरोरा शहरात आणले. हा कामगारांचा जत्था रत्नमाला चौकातून बोरा शहराकडे जाताना एकाही कामगाराने मास्क बांधलेला नव्हता. याची चर्चा शहरातील नागरिक करीत आहेत. विशेष म्हणजे, कामगार वरोरा शहरात आणले, याची कल्पनाही स्थानिक प्रशासनास दिली नसल्याचे समजते. जेव्हा कामगारांची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा त्यातील पाच कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने स्थानिक प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. पाचही कोरोना बाधित कामगारांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित कामगारांची कोरोना चाचणी करून ते राहत असलेल्या मंगल कार्यालय, लॉजमध्ये विलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाळ गुंजनकर यांनी दिली.
विलगीकरणाचा खर्च कोण करणार
कंत्राटदारांनी परराज्यातून कामगार आणले. त्यांना वरोरा शहरात ठेवले. यातील कामगार कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांना विलगीकरण करून ठेवण्यात आले. ते ठिकाण वरोरा शहरातील असल्याने त्याचा खर्च कोण उचलणार, हा प्रश्न पुढे आला आहे.
कामगार बाहेर फिरण्याची शक्यता
कामगारांचे विलगीकरण करण्यात आले ते ठिकाण वरोरा शहराच्या लोकवस्तीमध्ये आहे. त्यामुळे विलगीकरणाचे दिवस पूर्ण झाल्याशिवाय त्यांना शहरात फिरू देऊ नये. फिरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.