पाच वर्षांपासून शिक्षक पोटनिवडणूक मानधनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2017 12:26 AM2017-06-05T00:26:17+5:302017-06-05T00:26:17+5:30
तालुक्यात ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक व सार्वत्रिक निवडणुका २०१२ ते २०१५ या कालावधीत घेण्यात आल्या. शिक्षकांना मतदान प्रक्रियेसाठी कामाला लावण्यात आले.
कार्यवाही नाही : मानधन त्वरित देण्याची पुरोगामी शिक्षक समितीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यात ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक व सार्वत्रिक निवडणुका २०१२ ते २०१५ या कालावधीत घेण्यात आल्या. शिक्षकांना मतदान प्रक्रियेसाठी कामाला लावण्यात आले. त्याच्या मानधनासाठी तहसील प्रशासनाला निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाने रक्कम प्राप्त झाले नसल्याचे कारण दाखविले आहे. पाच वर्षांचा कालावधी होवूनही शिक्षकांचे अजूनपर्यंत निवडणुकीचे मानधन देण्यात आलेले नाही.
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे पहिले प्रशिक्षण १२ आॅक्टोबर व दुसरे प्रशिक्षण १७ आॅक्टोबर २०१२ रोजी घेण्यात आले. २० व २१ आॅक्टोबरला प्रत्यक्ष निवडणुका पार पडल्या. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण १९ जुलै व दुसरे प्रशिक्षण २६ जुलै २०१५ रोजी घेण्यात आले. त्यानंतर ३ व ४ आॅगस्ट २०१५ रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणूक प्रक्रियेत शिक्षक व सहकारी कर्मचारी सहभागी होते.
या विषयाला पाच वर्षांचा कालावधी लोटला असून अजूनपर्यंत पोटनिवडणूक व सार्वत्रिक निवडणुकांचे मानधन मिळाले नाही. या संदर्भात उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना ५ फेब्रुवारी २०१४ व ११ मे रोजी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती व संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मात्र अजूनपर्यंत निवेदनाची दखल प्रशासनानी घेतली नाही.
ग्रामपंचायत पोटनिवडणूक व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिक्षक व कर्मचारी तसेच २०१६-१७ मध्ये बीएलओचे काम करणारे कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा चिमूरचे अध्यक्ष मधुकर दडमल, सरचिटणीस विनोद महाजन, नरेंद्र मुंगले, उपाध्यक्ष राजू कापसे, योगेश देशमुख, एम.आर. शेडामे, गोविंद गोहणे, मनोज चव्हाण, रमेश मिलमिले, विजेंद्र मुरकुटे, डी.डी. रामटेके, संजय कापगते, हरिश्चंद्र कामडी, बाळकृष्ण नंदनवार तसेच बीट अध्यक्ष विजय धोंगडे, देविदास पसारे, शंकर गेडाम, अरुण चौधरी, राजू चांदेकर, गोवर्धन ढोक, सचिन शेरकी, शैलेश खरवडे आदींनी केली आहे.