विविध मागण्यांसाठी सिंदेवाहीत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:35 AM2018-03-15T01:35:48+5:302018-03-15T01:35:48+5:30
नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करून मागण्या पूर्ण कराव्या, यासाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात बुधवारी सिंदेवाही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
सिंदेवाही : नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करून मागण्या पूर्ण कराव्या, यासाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात बुधवारी सिंदेवाही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चाची सुरुवात शिवाजी चौक येथून करण्यात आली. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. निराधारांना दोन हजार रुपये अनुदान देण्यात यावे, घरकुले मंजूर करावी, थकित असलेले बिल लाभार्थ्यांना देण्यात यावे, सिंदेवाही तालुक्यात रोहयो अंतर्गत नहराचे काम सुरू करुन सिंचनाची सोय करावी, अनेक गावात बस जात नसल्याने बससेवा सुरु करावी, अन्नसुरक्षा योजनेचा लाभ गरिबांना देण्यात यावा, सरडपार ते चिटकी या रोडचे काम सुरू करावे. तसेच चिटकी येथील स्मशानभूमीचे काम तत्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्या यावेळी रेटून धरण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी केले. मोर्चात श्रमिक एल्गारचे महासचिव घनशाम मेश्राम, पुष्पा नेवारे, रवी नैताम, शशिकांत बतकमवार, गुलाब बोरुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार रावडे यांनी मोर्चास्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले व शासनाकडे सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. यावेळी वंदना मांदाडे, सौरभ उईके, मिलींद मडावी, प्रकाश सिडाम, अनुसया नैताम, नंदकिशोर वाकडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.