चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा कहर सुरूच, आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 01:35 PM2022-07-19T13:35:00+5:302022-07-19T13:35:43+5:30
चिमुरला सर्वाधिक फटका, झोपडीतील पाच जनावरांचा मृत्यू
चंद्रपूर : मागील १२ दिवसांपासून संततधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यात कहर केला. रविवारी रात्री आठ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. सर्वाधिक फटका चिमूर तालुक्याला बसला. उमा नदीच्या पुरामुळे चिमूर शहर जलमय झाले. अनेक घरांची पडझड झाली आहे. चिमूर उपजिल्हा रुगणालयात पाणीच पाणी आहे. या रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेली एक झोपडी बुडाल्याने त्यात बांधून असलेली पाच जनावरे बुडून मरण पावली.
मूल तालुक्यातील चिचाळा येथे घराची भिंत कोसळून त्याखाली दबून चार शेळ्यांचा मृत्यू झाला, तर १० शेळ्या जखमी झाल्याची घटना घडली.२४ तासांत सावली तालुक्यात सर्वाधिक १४० व चिमुर तालुक्यात १२५ मि.मी. पाऊस कोसळला. मूल तालुक्यात ९७.४, ब्रह्मपुरीत ९३.६, सिंदेवाहीत ९२.६, पोंभूर्णात ८२.४, नागभीडात ७९.२ तर वरोऱ्यात ७८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. याअतिवृष्टीमुळे चिमुर तालुक्यातील उमा नदीला पूर आला. मूरपार कोळसा खाण बंद पडली. शंकरपुरात सात घरांची पडझड झाली. पांजरेपार येथील पाच घरांमध्ये तर भिसी मार्गावरील पिंपळनेरी, नवेगावपेठ या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. भिसीचा गांधी तलाव फुटून शेतातील धान, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिपर्डा येथे एक ट्रॅक्टर पाण्यात बुडाला. खातोडा येथील पाच जणांना बोटीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. पुरामुळे अनेक भागातील पिके पाण्याखाली आली आहे. सिंदेवाही तालुकाही या पुराची झळ पोहोचली आहे. नागभीड तालुक्यातील घोडाझरी व सावली तालुक्यातील आसोलामेंढा धरण फुल्ल झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरले आहे.
हे मार्ग पडले बंद
चिमूर-भिसी-नागपूर हा महामार्गासह खडसंगी- भानसुली, खडसंगी-मूरपार, चिमूर-पळसगाव, सिंदेवाही -वासेरा, रत्नापूर-खांडला सरांडी, मूल ते चामाेर्शी व वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वरोरा ते वणी मार्गही बंदमार्ग बंद पडला. ब्रह्मपुरीतील नान्होरी मार्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
चंद्रपूर जिल्ह्यावर निसर्ग कोपला, अताेनात नुकसान
७ जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व नद्यांना आलेल्या महापुरामुळे सुमारे १५ हजार हेक्टर शेतातील उभी पिके वाहून गेली. शेतकऱ्यांनी पावसाची वाट पाहून उशिरा पेरणी केली आणि पावसाने घात केला. चंद्रपूर शहरालाही इरईच्या पुराचा जबर फटका बसला. शहराचा सुमारे १० टक्के भागात पुरामुळे प्रभावित झाला.