वर्धा, वैनगंगेचा कहर; २६ गावांना वेढा, १८१३ जणांना हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 12:44 PM2022-07-20T12:44:25+5:302022-07-20T12:47:41+5:30
वरोरा, मूल, भद्रावती, पोंभुर्णा तालुक्यात सर्वाधिक फटका
चंद्रपूर : वर्धा व वैनगंगा नदीला पूर आल्याने आपत्ती व्यवस्थापन पथकाने वरोरा, मूल, पोंभुर्णा, भद्रावती तालुक्यातील १८१३ जणांना सुरक्षितस्थळी हलविले.
अप्पर वर्धा व इरई धरणाच्या पाण्याने माजरीत आंबेडकर वार्ड, एकता नगर, वार्ड न. ३ मध्ये हाहाकार उडाला. बल्लारपूर-राजुरा मार्ग पुरामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बंद झाला. वरोरा, भद्रावती, मूल, पोंभुर्णा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. अनेक गावांची वीज खंडित झाल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. वरोरा तालुक्यातील करंजीच्या २५० पूरग्रस्तांना साई मंगल कार्यालयात ठेवण्यात आले.
वरोरातही शिरले पाणी
वरोरा : वर्धा नदीत धरणाचे पाणी सोडल्याने तालुक्यातील सोईट, कोहोपरा, करंजी, आष्टी, बामरडा, दिंदोळा, आमडी निलजई गावांना पुराने वेढा घातला. सोमवारी मध्यरात्री गावात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. करंजीत पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्रीच जुन्या वसाहतीत व समाजभवनात आश्रय घेतला. दिंदोळा मारडा चिकणी मार्ग बंद आहे. वरोरातील यात्रा वार्डातील अनेक घरांत पाणी शिरले. नगरपरिषदने शहरातील नगर भवनात पूरग्रस्तांची व्यवस्था केली. सोईट, बोरी, निलजई, आमडी, बामर्डा, दिंदोळा पांजुर्णी नांद्रा येथील वीजपुरवठा खंडित झाला.
रेस्क्यू चमू दाखल
पुरातून बाहेर काढण्याकरिता रेस्क्यू ऑपरेशन दाखल झाली. या पथकाने सोईट येथील नागरिकांना बाहेर काढले. दिंदोळा येथील नागरिकांना नजीकच्या प्रकल्प वसाहतीत स्थलांतरित करण्यात आले.
कुचना व नागलोन शाळेत आश्रय
कुचना : अप्पर वर्धा, लोअर वर्धा व बेंबाळ प्रकल्पामुळे वर्धा नदीचे पाणी अनेक गावांत शिरले. पळसगाव येथील तीन जनावरांचा बुडून मृत्यू झाला. मनगाव-राळेगाव-थोरणा गावांचा संपर्क तुटला आहे. पाटाळा-पळसगाव-माजरी गावांतही पाणी शिरले.
पळसगावातील घरे पाण्याखाली आल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. नागरिक रात्र जागत आहेत. कुचना व नागलोन येथील पूरग्रस्तांनी शाळेत आश्रय घेतला.
माजरी तिसऱ्यांदा जलमय
भद्रावती : पुराचे पाणी तिसऱ्यांदा माजरी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नदी काठावर घरे असणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. अप्पर वर्धा व इरई धरणाच्या पाण्याने आंबेडकर वार्ड, एकता नगर, वार्ड न.३ मध्ये हाहाकार उडविला. सर्व मार्ग बंद झाले. शिरना, वर्धा नदी पूल व पाटाळा येथे माजरी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. १९९४ मध्ये अशा प्रकारचा पूर आला होता. मनगाव व थोराणा गावांचा संपर्क तुटला. राळेगावातील शेतकऱ्यांचे कृषी साहित्य पुरात वाहून गेले. अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे पूर वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पूर नियंत्रण विभागाचे निरीक्षक एम. एस. काकडे यांनी केले.
बामणी-राजुरा मार्ग बंद
बल्लारपूर : चार दिवसांपूर्वी सुरू झालेला बल्लारपूर-राजुरा मार्ग पुरामुळे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता बंद करण्यात आला. किल्ला वॉर्डाकडून विसापूरकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी शिरले. बल्लारपूर पोलीस ठाणे, रेल्वे गोल पुलावर पुराचे पाणी येण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे वस्ती भागातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली.
जुनगावचा संपर्क तुटला
देवाडा बुज (जुनगाव) : वैनगंगेच्या पुराने पोंभुर्णा तालुक्यातील जुनगावचा संपर्क तुटला. देवाडा बुज, जुनगाव, गंगापूर टोक येथील सोयाबीन व कपाशीला जोरदार फटका बसला आहे. जुनगाव हे गाव दोन नद्यांच्या संगमावर असल्याने समस्यांच्या गर्तेत सापडले.
भिंत कोसळल्याने ३ शेळ्या ठार
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सदाशिव मड़ावी यांच्या घराची भिंत कोसळल्याने दिलीप वलके यांच्या तीन बकऱ्या ठार तर एक जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. मडावी यांच्या घराला लागूनच वलके यांचे घर आहे. शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी वलके यांनी केली.