गोवरी-सास्ती गावाला पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:01+5:302021-06-11T04:20:01+5:30
वेकोलिने जिवंत नाल्याचा प्रवाह बदलला : मातीचे महाकाय ढिगारे टाकल्याने शेकडो हेक्टर शेती बुडण्याची भीती नितीन मुसळे/प्रकाश काळे ...
वेकोलिने जिवंत नाल्याचा प्रवाह बदलला : मातीचे महाकाय ढिगारे टाकल्याने शेकडो हेक्टर शेती बुडण्याची भीती
नितीन मुसळे/प्रकाश काळे
सास्ती / गोवरी : वेकोलिने जिवंत नाल्याचे प्रवाह बदलले. काही ठिकाणी नैसर्गिक नालेच बंद करून नवीन नाल्यांची निर्मिती केली. मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या किनाऱ्यावर टाकल्याने गोवरी, सास्ती गावाला यंदा मोठ्या प्रमाणात पुराचा धोका निर्माण झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु वेकोलिने यावर अजूनही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही.
राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. वेकोलिने कोळसा उत्खननासाठी मातीचे महाकाय ढिगारे सास्ती, गोवरी, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव, बाबापूर परिसरात टाकले आहे. परंतु वेकोलिने मातीचे ढिगारे टाकताना भविष्यात होणाऱ्या धोक्याचा जराही विचार केला नाही. उलट गोवरी, सास्ती, चिंचोली (खु.) परिसरातील जिवंत नाले बदलून नवीन नाले वेकोलिने तयार केले. त्यामुळे यंदा या परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोवनी २ विस्तारित कोळसा खाणींसाठी वेकोलिने हिरापूर, चिंचोली (खु.) परिसरात नैसर्गिक जिवंत नाल्याचे पात्र बदलून नवीन नाला तयार केला आहे. नैसर्गिक जिवंत नाल्याचे प्रवाह बदलविणे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. परंतु वेकोलिने नियम धाब्यावर बसवून सर्रास मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या किनाऱ्यावर टाकले. तसेच नैसर्गिक नाले बदलविण्यात आल्याने यंदा वेकोलि परिसरात गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता बळावली आहे. कोळसा काढण्याच्या हव्यासापोटी वेकोलि गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याने वेकोलिचे दुष्परिणाम नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून सहन करावे लागत आहेत. परंतु गावकऱ्यांच्या समस्येशी काहीही घेणेदेणे नसलेल्या वेकोलि प्रशासनाने आजपर्यंत गावकऱ्यांचे हित जोपासले नाही. हे वेकोलि परिसरातील गावकऱ्यांचे दुर्दैव आहे.
कोळसा खाणींचे निर्माण झाल्यापासून वेकोलि परिसरातील गावांमध्ये अन्याय करीत आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने अद्यापही वेकोलिविरोधात आवाज उठविला नाही. हे न समजणारे कोडेच आहे. त्यामुळे वेकोलिचे दुष्परिणाम गावकरी केव्हापर्यंत सहन करणार, हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून अनुत्तरितच आहे.
कोट
वेकोलिने गोवरी-सास्ती गावाच्या सभोवताल मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहेत. मातीच्या ढिगाऱ्याला पाण्याचा प्रवाह अडून यंदा मोठ्या प्रमाणात बॅकवॉटरचा फटका बसण्याची शक्यता आहे. वेकोलिमुळे परिसरातील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला असून वेकोलिने अजूनही कोणतीच कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही.
- आशा उरकुडे,
सरपंच, गोवरी
कोट
वेकोलिने नदी, नाल्याच्या किनाऱ्यावर टाकलेले मातीचे महाकाय ढिगारे नियमबाह्य आहेत. काही ठिकाणी वेकोलि प्रशासनाने नैसर्गिक नाल्याचे प्रवाह बदलविण्याने परिसरातील गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच शेकडो हेक्टरवरील शेती पाण्याखाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- सुनील चिलविरवार, निसर्गप्रेमी
बॉक्स
गावकऱ्यांच्या नशिबाचे भोग संपेना
राजुरा तालुक्यात जेमतेम ३०-३५ वर्षांपूर्वी कोळसा खाणींचे निर्माण करण्यात आले. सास्ती, गोवरी, पोवनी परिसरात कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे असल्याने कालांतराने तालुक्याला खुल्या कोळसा खाणींचा वेढा पडला. वेकोलीने कोळसा उत्पादनाच्या हव्यासापोटी नियम धाब्यावर बसविले. त्यामुळे वेकोली परिसरातील गावांना वेकोलिने केलेल्या दुष्परिणामांचा मोठा फटाका बसला आहे. परंतु अजूनही गावकऱ्यांचे भोग संपायला तयार नाही. हे गावकऱ्यांचे दुर्दैव आहे.