तेलंगणातील पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:12+5:302021-07-24T04:18:12+5:30
जिवती : महाराष्ट्रातील जिवती ते तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जाणाऱ्या मुख्य मार्गावर तेलंगणातील गादीगुडा येथील नाल्याला पूर आल्यामुळे त्याचा फटका ...
जिवती : महाराष्ट्रातील जिवती ते तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जाणाऱ्या मुख्य मार्गावर तेलंगणातील गादीगुडा येथील नाल्याला पूर आल्यामुळे त्याचा फटका महाराष्ट्रातील काही गावांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले आहे.
तेलंगणातील गादीगुडा या गावाला मोठा नाला आहे. सततच्या पावसामुळे नाल्याला पूर आला आहे. या पुरामुळे काही किमी अंतरावर महाराष्ट्राच्या सेवादासनगर, जोडणघाट, महाराजगुडा, वणी (बु) या गावातील शेतकऱ्यांची जवळपास ६० टक्के शेती आहे. नाल्याला गुरुवारी रात्री उशिरा मोठा पूर आल्याने शेती पाण्याखाली गेली आहे.
सेवादासनगर येथील नाथराव हरी राठोड यांच्या संपूर्ण साडेतीन एकर शेतातील पीक पुरात वाहून गेले. वामन राठोड, कनिराम राठोड, शंकर राठोड, सुलाबाई चव्हाण, उत्तम जाधव, झालुबाई राठोड यासह गावातील २० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महाराजगुडा येथील सात शेतकऱ्यांचे तर जोडणघाट व वणी येथीलही काही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तेलंगणा राज्यातील नदीकाठावरील महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक वाहून गेल्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देऊन भरपाई देणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.