राजा बिरशहाच्या समाधीस पुष्पअर्पण कार्यक्रम
By Admin | Published: February 15, 2017 12:45 AM2017-02-15T00:45:07+5:302017-02-15T00:45:07+5:30
इको-प्रो संस्था व एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारला व्हॅलेंटाईन दिनाचे औचित्य साधून ...
व्हॅलेंटाईन' दिन साजरा : इको-प्रो व एफ ई एस महाविद्यालयाचा उपक्रम
चंद्रपूर : इको-प्रो संस्था व एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयाच्यावतीने मंगळवारला व्हॅलेंटाईन दिनाचे औचित्य साधून गोंडराजाच्या समाधीस्थळवरील राजा बिरशाह यांच्या समाधीस पुष्पअर्पण कार्यक्रम पार पडला.
प्रेमाचे प्रतीक म्हणून राजा बिरशाहच्या समाधीकडे बघितले जाते. परंतु, राणी हिराईने आपले पती राजा बिरशाह यांच्या प्रति असलेले प्रेम फक्त स्मारकापूरते मर्यादित न ठेवता, आपल्या चौफेर कार्यातूनन दाखवून दिले आहे. त्याचा उजाळा आजच्या युवा पिढीला व्हावा, आणि प्रेमाचा खरा अर्थ कळवा याकरिता दरवर्षी प्रेम दिनाच्या दिवशी राजा बिरशाह यांच्या समाधीस पुष्पअर्पण करण्यात येते.
१४ फेब्रुवारीला देशभरात 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केला जातो. त्यामुळे युवा पिढी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे लागून सर्वस्व गमविण्याच्या कित्येक घटना समोर येत असतात. युवा विचारांना वेगळी दिशा मिळावी म्हणून राजा बिरशाहच्या समाधी वर पुष्पअर्पण करून प्रमेविरांना इतिहासाची माहिती देण्यात येते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभू चोथवे तर प्रमुख पाहुणे म्हणून इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, प्रा डॉ विद्या वैद्य, प्रा डॉ देशमुख, प्रा डॉ इसादास भडके, धर्मेंद्र लुनावत आदी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य चोथवे म्हणाले, भारतीय संस्कृतीत प्रेमाचे व्यापक स्वरूप आहे. व्हॅलेंटाइन डे म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीच्या निमित्याने आपण प्रदूषण निर्माण करीत आहोत. आपल्या शहरात ऐतिहासिक बिरशाह समाधीच्या रुपाने प्रेरक आणि सुंदर समाधी आहे. आपण आई-वडील,भाऊ-बहीण यांच्या प्रेमाचा विस्तार केला पाहिजे. इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले, राजा बिरशाह समाधी म्हणजे सुंदर वास्तू राणी हिराई ने बांधून त्यांच्या प्रति असलेले प्रेम आपल्या कायार्तून अजरामर केले. या निरागस प्रेमाचा इतिहास आपण जानला पाहिजे. युवकांनी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे लागू नये. आपल्या विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता विशिष्ट दिवसाची गरज नसून ते आपल्या वागणुकीतून आणि कायार्तून व्यक्त व्हायला पाहिजे, असे मत व्यक्त केले.यावेळी प्रा डॉ विद्या वैद्य यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ इसादास भडके तर आभार प्रा आनंद वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा.मेघमाला मेश्राम, प्रा राजेंद्र बरसागडे, प्रा राजेश चिमनवार, प्रा अशोक बन्सोड तसेच इको - प्रो चे सर्व सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)