चंद्रपूर जिल्ह्यात ३७२ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:13 PM2018-04-04T14:13:30+5:302018-04-04T14:13:39+5:30

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ३७२ गावांमधील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. जिल्ह्यात ३२६ नळयोजना अस्तित्वात असल्या तरी ४६ गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता कोणतीही उपाययोजना नसल्याची माहिती आहे.

Fluoride water in 372 villages in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात ३७२ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी

चंद्रपूर जिल्ह्यात ३७२ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्षगावकऱ्यांना विविध आजाराची लागण

घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ३७२ गावांमधील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. जिल्ह्यात ३२६ नळयोजना अस्तित्वात असल्या तरी ४६ गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता कोणतीही उपाययोजना नसल्याची माहिती आहे.
फ्लोराईडयुक्त गावांचे सन २०१४-१५ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यात ३७२ गावे आढळून आली. या गावातील स्रोत्रातून येणारे पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. एवढेच नाही तर विविध आजारांना आमंत्रण देणारे आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने दात पिवळे पडणे, सांधेदुखीचा त्रास होणे, हातपाय नेहमी दुखणे अशाप्रकारचे अनेक आजार होतात.
या गावांना निदान पिण्यासाठी तरी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहे. मात्र असे असले तरी ४६ गावे अद्यापही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. २८ गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलस्वराज्य-२ अंतर्गत योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याचे आणि १८ गावात योजना प्रस्तावित केल्याचे पाणीपुरवठा विभाग सांगत आहे. मात्र या गावांना प्रत्यक्षात शुद्ध पाणी केव्हा मिळेल, याबाबत कोणीही सांगू शकत नाही.

नवानगरचा संघर्ष
नागभीड तालुक्यातील नवानगर हे गावही फ्लोराईडयुक्त आहे. सतत फ्लोराईडयुक्त पाणी पित असल्याने नवानगरचे नागरिक विविध आजारांचे बळी ठरत आहेत. आम्हाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी गावकऱ्यांचा २००५ पासून संघर्ष सुरू असला तरी त्यांना अद्यापही शुद्ध पाणी मिळाले नाही. परिणामी त्यांना फ्लोराईडयुक्तच पाणी प्यावे लागत आहे. येथील नागरिकांनी आतापर्यंत सर्वच अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे उंबरटे झिजवले. पण गेल्या १३ वर्षात त्यांची मागणी कुणीच पूर्ण करू शकले नाही.

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग ३२६ गावात पिण्याच्या शुद्ध पाण्याकरिता नळयोजना अस्तित्वात असल्याचे सांगत आहे. मात्र यात शंका असून नळयोजनांचा अनुभव लक्षात घेता त्या केवळ अस्तित्वातच असाव्यात. किती गावांना प्रत्यक्षात पाणी मिळत आहे, याची सविस्तर माहिती आपण पाणीपुरवठा विभागाला मागणार आहे.
- संजय गजपूरे
जि.प.सदस्य, चंद्रपूर.

Web Title: Fluoride water in 372 villages in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी