काटवलवासीयांना फ्लोराईडयुक्तच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:18 AM2018-04-12T01:18:57+5:302018-04-12T01:18:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनखेडा : आजपर्यंत फ्लोराईडयुक्त पाण्याने सांधेदुखी व दाताच्या आजाराला बळी पडलेल्या काटवल भगत वासीयांना शुध्द पाण्याचा अॅक्वा प्लान्ट मिळाला. परंतु, तो सुरू करण्यास विलंब होत असल्याने गावकऱ्यांना फ्लोराईडयुक्त पाण्यानेच आपली तहान भागवावी लागत आहे. सद्यस्थितीत अॅक्वा प्लान्ट केवळ शोभेची वस्तू ठरले आहे.
चंदनखेडावरून अवघ्या चार कि.मी. अंतरावरील काटवल भगत हे गाव पारोधी ग्रा.पं.मध्ये समाविष्ठ आहे. येथील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्याने या गावातील नागरिकांना सांधे दुखणे तसेच दाताच्या आजाराला बळी पडावे लागले होते. त्यामुळे गावात अॅक्वा प्लान्ट किंवा नदीवरील नळयोजनातून पाणीपुरवठा करावा, यासाठी गावकºयाने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे उपाययोजना म्हणून प्रशासनाने गावात जलस्वराज्य योजनेअंतर्गत अॅक्वा प्लान्ट उभारला. मात्र दोन महिन्यांपासून हा प्लांन्ट सुरू होवू शकलेला नाही.
कंत्राटदारांला याबाबत विचारणा केली असता एटीएम मशिनची सबब सांगून वेळ मारून नेत आहे. तर प्रशासनही ही बाब गांभीर्याने नसल्याने गावकºयांना फ्लोराईडयुक्त पाण्यानेच तहाण भागवावी लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
प्लान्ट सुरू करण्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष आहे. पाणीपुरवठा विभागास विचारणा केली असता योग्य प्रतिसाद मिळत नाही
- व्ही. पी. वाठोडकर
ग्रामसेवक, ग्रा.पं. पारोधी.
दोन महिन्यांपासून शुद्ध पाण्याचा प्लान्ट उभारला आहे. आता पाण्याची गरज असतानाही कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने प्लान्ट उपायोगात येत नसेल तर आंदोलन करावे लागेल.
- सागर भांगळे
सामाजिक कार्यकर्ता, पारोधी.