रखरखत्या उन्हात पाण्यासाठी होरपळ

By admin | Published: April 16, 2017 12:25 AM2017-04-16T00:25:17+5:302017-04-16T00:25:17+5:30

बहुसंख्य गावातील पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना असूनही त्या निष्फळ ठरत आहेत. पाणी हेच जीवन आहे. पण पाणी नसेल तर जीवन जगणे कठिण होते.

Flurry in water for drying | रखरखत्या उन्हात पाण्यासाठी होरपळ

रखरखत्या उन्हात पाण्यासाठी होरपळ

Next

फेब्रुवारी ते जुलैमध्ये हाल : कायमस्वरूपी योजना कार्यान्वित करा
शंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे जिवती
बहुसंख्य गावातील पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना असूनही त्या निष्फळ ठरत आहेत. पाणी हेच जीवन आहे. पण पाणी नसेल तर जीवन जगणे कठिण होते. अशीच परिस्थिती माणिकगडच्या पहाडावर आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून जिवती तालुक्यातील १३ पेक्षा अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरू आहे. रखरखत्या उन्हामध्ये नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
‘लोकमत’ने दि. १४ एप्रिल रोजी टंचाईग्रस्त गावांना भेटी दिल्या. यावेळी पाणी टंचाईचे वास्तव रूप पाहायला मिळाले. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्याप्रमाचे जिवाची काहिली होत आहे. या उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. माणिकगडावरील खडकी, मच्छिगुडा, चलवतगुडा, घोडणकप्पी, आनंदगुडा, संगणापूर, लोलडोह, पाटागुडा, वणी (खु.), पोचुगुडा, लेंडीगुडा, धनपठार, जनकापूर आदी १३ गावांपेक्षा अधिक गावे तालुक्यात टंचाईग्रस्त आहेत. मात्र नऊ गावांचा समावेश टंचाई आराखड्यामध्ये करण्यात आला आहे.
शासन प्रत्येक वर्षी या गावांमधील टंचाई दूर करण्याठी लाखों रुपये खर्च करीत असते. तरीही वर्षांनुवर्षे या गावांना पाणी टंचाईची झळ पोहोचत असते. उन्हाळा आला की, प्रशासन गावात टँकरने पाणीपुरवठा करून मोकळे होते. त्यानंतर स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. फेब्रुवारीपासून टंचाई असली तरी जिल्हा प्रशासनाने टँकरची सोय केली नसल्याने मिळेल तेथून बैलगाडी, डोक्यावर हंडे भरून आणले जातात.



सर्वांनाच पाणीटंचाईचा फटका
पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावातील शाळकरी मुलांपासून वयोवृद्ध व महिलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी भरताना मोठे गर्दी उसळत असते. त्यामुळे पाणी मिळण्यास उशीर होतो. त्यावेळी मुले शाळेत उशिरा पोहोचतात. दूषित पाण्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. संबंधित ग्रामपंचायतने वेळोवेळी ब्लिचिंग पावडर टाकले नसल्याने पाणी दूषित मिळत आहे. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. तसेच सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात विवाह समारंभ सुरू असून तेथे पाण्याची अडचण निर्माण होत आहे. काही सधन नागरिक प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या कॅन खरेदी करीत आहेत. मात्र गरिबांना पाणी खरेदी करून विवाहामध्ये पाहुण्यांना देणे परवडत नाही.

जिल्हाधिकाऱ्यांचाही दौरा
जिवती तालुक्यात पाणी टंचाईचे भीषण स्वरूप निर्माण झाले असताना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे आणि उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासह आनंदगुडा या गावाला भेट दिली व पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले.
पाणी टंचाईचा
वन्यजीवांना फटका
उन्हाची तीव्रता वाढल्याने मानवासह वन्यजीव व पशुंनाही पाणी मिळणे कठिण झाले आहे. पाण्यासाठी जंगली पशू व प्राणी गावांकडे धाव घेत आहेत, त्यामुळे गावकरी भयभीत आहेत.
सिंचनाची सोय व्हावी
परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर-दऱ्या आहेत. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देवून सर्वेक्षण करावे. तलाव, बंधारे, मातीबांध आदी कामे केल्यास पाणी साठवण क्षमतेत वाढ होऊन पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल. पाणी टंचाईची आढावा बैठक झाल्यानंतर तहसीलदार रवींद्र राघोड व गटविकास अधिकारी मांडवे यांनी टंचाईग्रस्त गावांचा संयुक्त दौरा केला. आता कृतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Flurry in water for drying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.