कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांवर लक्ष केंद्रित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:38+5:302021-07-17T04:22:38+5:30
चंद्रपूर : कोविडमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत, अशा अनाथ बालकांची माहिती ...
चंद्रपूर : कोविडमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत, अशा अनाथ बालकांची माहिती घेऊन त्यांच्याकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कृती दलाच्या बैठकीत दिले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, मनपा उपायुक्त अशोक गराटे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. वर्षा जामदार, महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर व उपशिक्षणाधिकारी (माध्य) पूनम मस्के उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, ज्या पालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत, अशा बालकांची तालुकास्तरावरून माहिती गोळा करावी. अनाथ बालकांच्या मालमत्ता सुरक्षित करण्याबाबत जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांना जबाबदारी सोपविली. त्याबाबत योग्य कार्यवाही करावी. आतापर्यंत कोविडमुळे १५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक पालकांचा समावेश आहे. याची खातरजमा करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत डेथलिस्ट व संपर्क क्रमांक घेऊन मृत व्यक्तीची माहिती कॉलसेंटरद्वारे कॉल करून प्राप्त करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिल्या.