सावली तालुक्याला १ लाख ९८ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष
By admin | Published: June 19, 2016 12:51 AM2016-06-19T00:51:40+5:302016-06-19T00:51:40+5:30
वनविभागाच्या वतीने महाराष्ट्रात दोन कोटी वृक्ष लागवड केली जाणार असून सावली तालुक्याला १ लाख ९८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याची माहिती, ..
नागरिकांना आवाहन : वनविभागाचे नियोजन
सावली : वनविभागाच्या वतीने महाराष्ट्रात दोन कोटी वृक्ष लागवड केली जाणार असून सावली तालुक्याला १ लाख ९८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याची माहिती, वनपरिक्षेत्राधिकारी एम. पी. राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
वृक्ष लागवडसंदर्भात शासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था यांच्या माध्यमातून कार्यक्रम आखण्यात आला आहे. याशिवाय तालुक्यात असणाऱ्या सर्व बँकांचाही वृक्ष लागवडीकरिता सहभाग राहणार असल्याचे सांगितले आहे.
१ जुलै रोजी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध स्तरांवर जाहिरातीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित करुन नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य सावली वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी करीत आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष वनपरिक्षेत्राधिकारी एम. पी. राठोड यांनी आपल्या वाहनावर दोन कोटी वृक्ष लागवडीचे फलक लावून ध्वनिक्षेपणाद्वारे स्वत: प्रचार व प्रसार यंत्रणेत गुंतले आहेत.
वृक्ष लागवड हा राष्ट्रीय कार्यक्रम असून सर्वच शासकीय विभाग व खासगी कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्यापरीने वृक्ष लागवडीची जबाबदारी घेतली आहे. मात्र शासनाने वृक्ष लागवड व संवर्धनासाठी निर्माण केलेला सामाजिक वनिकरण विभाग कुठेच पुढाकार घेताना आढळून आलेला नाही. (तालुका प्रतिनिधी)