कोरोनाचा डेथ रेट रोखण्यासाठी अर्ली डिटेक्शनवर करणार फोकस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 08:55 PM2020-09-08T20:55:12+5:302020-09-08T20:55:34+5:30
डेथ रेट रोखण्यासाठी अर्ली डिटेक्शन (लवकर निदान) आणि जादा आरोग्यसुविधा वाढविण्यावर यापुढे फोकस राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी मंगळवारी लोकमतशी संवाद साधताना दिली.
राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली तर दुसरीकडे बाधितांचा जिल्ह्यातील मृत्यू दर (डेथ रेट) ही वाढत आहे. मूळात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतरही काही रूग्ण धास्तीमुळे उपचारासाठी उशिरा रूग्णालयात दाखल होतात. उपचार करण्यास डॉक्टरांना दोन-चार दिवसही मिळत नाही. अशाच रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे डेथ रेट रोखण्यासाठी अर्ली डिटेक्शन (लवकर निदान) आणि जादा आरोग्यसुविधा वाढविण्यावर यापुढे फोकस राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी मंगळवारी लोकमत शी संवाद साधताना दिली.
वाढते कोरोना रूग्ण व प्रतिबंधक उपाययोजनांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देवून जिल्हाधिकारी गुल्हाणे पुढे म्हणाले, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना स्वगावी येण्यापूर्वी आरोग्य तपासणीसाठी केंद्र तयार करण्यात आले होते. आता जिल्हाबंदी उठल्याने हे सर्व केंद्रे बंद करून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरीत केले. अशा केंद्रांमध्ये सद्यस्थितीत १,३०० बेड्स उपलब्ध आहेत. गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी क्रिटीकल केअर सेंटर व आयसीयु बेड्स सज्ज ठेवल्या असून लिक्विड आॅक्सिजन प्लॉन्टही लवकरच सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले..
असे आहेत अर्ली डिटेक्शनचे फायदे
कोरोना लपवून ठेवणे अत्यंत धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना आहेत. या पार्श्वभूमीवर अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकर निदानाचे फायदे याबाबत विचारले असता जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे म्हणाले, आजार लपवून लॅटर स्टेजमध्ये उपचारासाठी येणे जीवावर बेतणारे आहे. त्यामुळे यापुढे अर्ली डिटेक्शन भर देणे सुरू झाले. लक्षणे वाढायच्या आधीच संयशित रूग्ण, त्यांच्या कुटुंबातील, संपकार्तील व हाय रिस्क सदस्य अशा सर्वांचीच चाचणी केली जाते. याशिवाय आयएलआय व सारी आदी सर्वेक्षण करून कोरोना स्प्रेड रोखला जावू शकतो. लवकर निदानामुळे कोरोनाचे स्पॉट निश्चित करता येतात. यासाठी जिल्ह्यातील ५० वर्षांवरील नागरिकांची पल्स ऑक्झिमीटरने टेस्टींग सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनावर उपचारासाठी डॉक्टरांना किमान पाच दिवस मिळाले तर...
लक्षणे दिसताच क्षणी लगेच कोरोना चाचणी केली नाही तर अनेक क्रिटीकल निर्माण होवू शकतात. आजाराच्या धास्तीमुळे लपून घरीच बसणे जीवघेणे ठरू शकते. डॉक्टरांना किमान पाच ते दिवस उपचारासाठी मिळाले तरी मृत्यू रोखता येवू शकतात. उपचारासाठी उशिरा रूग्णालयात आल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतचे ४८ कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत. लवकर उपचार झाले असते तर चित्र वेगळे असते, असा दावाही जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.
होम आयसोलेशनचाही पर्याय
सौम्य व लक्षणे नसणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना जर त्यांच्या घरांमध्ये योग्य प्रकारे सुविधा असतील तर घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देता येईल. त्याकरिता केंद्र सरकारच्या ७ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे लागते. गृहविलगीकरणाची पात्रता, वैद्यकीय मदत कशी घ्यायची, होम आयसोलेशनच्या पायऱ्या निश्चित केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी गुल्हाणे यांनी लोकमत दिली.
जनता कर्फ्यू जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठीच
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंर्द्रपूर महानगरपालिका क्षेत्र व बल्लारपूर शहरात १० सप्टेंबर ते १३ सप्टेंबर रविवारपर्यंत जनता कर्फ्यू होणार आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीनेच निर्णय झाला. जनता कर्फ्यू हा नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठीच आहे. या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करावे. कुणाचीही चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली तरी घाबरू नका. मात्र, कोरोना आजार कदापि लपवून ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी संवादादरम्यान केले.